जिल्हा परिषद शाळा साखरा येथे जागतिक हात धुवा दिनानिमित्त जनजागृती
साप्ताहिक सागर आदित्य
विद्यार्थ्यांनी स्वच्छतादूत म्हणून जबाबदारी निभवावी : उपशिक्षणाधिकारी कृष्णा बिरादार
जिल्हा परिषद शाळा साखरा येथे जागतिक हात धुवा दिनानिमित्त जनजागृती
वाशिम, : विद्यार्थ्यांनी केवळ स्वतःच्या स्वच्छतेपुरते मर्यादित न राहता समाजातही स्वच्छतेचे विचार रुजवावेत. स्वच्छतेचे महत्त्व इतरांना पटवून देत विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने स्वच्छतादूत म्हणून आपली जबाबदारी पार पाडावी, असे प्रतिपादन उपशिक्षणाधिकारी कृष्णा बिरादार यांनी केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अंबादास कऱ्हे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जगन्नाथ इंगळे, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे क्षमता बांधणी तज्ज्ञ प्रफुल्ल काळे, जनसंपर्क अधिकारी राम श्रृंगारे, मनुष्यबळ विकास सल्लागार शंकर आंबेकर आणि पाणी गुणवत्ता सल्लागार अभिजीत दुधाटे उपस्थित होते.
जागतिक हात धुवा दिनानिमित्त (१५ ऑक्टोबर) भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळा, साखरा येथे विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शंकर आंबेकर यांनी विद्यार्थ्यांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. योग्य पद्धतीने हात धुण्याचे महत्त्व, हात धुण्याच्या विविध पायऱ्या तसेच दैनंदिन जीवनात स्वच्छतेच्या सवयी अंगीकारण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांच्या निर्देशानुसार, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गजानन खुळे यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा, आरोग्य केंद्रे आणि ग्रामपंचायतींमध्ये जागतिक हात धुवा दिन साजरा करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यात विविध ठिकाणी हात धुवा दिनानिमित्त जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यावेळी राम श्रृंगारे आणि शंकर आंबेकर यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जेवणापूर्वी, शौचालयाचा वापर केल्यानंतर तसेच आवश्यक त्या वेळी साबणाने हात धुणे ही आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची सवय आहे. हातांची योग्य स्वच्छता राखल्याने संसर्गजन्य आजारांचा धोका कमी करण्यास मदत होते, हे विद्यार्थ्यांना उदाहरणांसह समजावून सांगण्यात आले.
कार्यक्रमाला मुख्याध्यापक अंबादास कऱ्हे, राजु महाले सर, निशा वानखेडे, विशाखा भगत, शिल्पा इंगळे, कल्पना चौधरी, गजानन काळे, राजेश इंगोले, सय्यद कट्टू, कांचन हरणे आणि सुधीर कांबळे विठ्ठल महाले यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.
0 Response to "जिल्हा परिषद शाळा साखरा येथे जागतिक हात धुवा दिनानिमित्त जनजागृती"
Post a Comment