कारंजा शहरातील पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजनांचा आराखडा तयार करा
साप्ताहिक सागर आदित्य
💧 कारंजा शहरातील पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजनांचा आराखडा तयार करा
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे निर्देश; पाणीपुरवठा योजनेची प्रत्यक्ष पाहणी
वाशिम, :कारंजा शहरातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करून नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी सर्वंकष नियोजन करावे. तसेच पाण्याची बचत, तलावांचे खोलीकरण आणि अन्य आवश्यक उपाययोजनांचा आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी आज कारंजा शहराला भेट देऊन जलशुद्धीकरण केंद्र, ऋषी तलाव, अडाण धरणावरील जॅकवेल, खोलेश्वर मंदिर संस्थान, मंगरूळ वेश आणि सारंग तलाव या ठिकाणांची पाहणी केली. या वेळी त्यांनी उपलब्ध जलस्रोतांची स्थिती जाणून घेतली आणि पाणीटंचाई निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
शहरातील सर्व भागांना पाणीपुरवठा करता यावा, यासाठी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करावे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, यासाठी व्यापक जनजागृती करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन पाणीबचतीच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याची सूचनाही त्यांनी केली.
तसेच तलावांचे खोलीकरण आणि पाणीटंचाई निवारणासाठी आवश्यक असलेल्या इतर उपाययोजनांचा समावेश असलेला आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पाण्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करून संभाव्य टंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी नगरपालिका सहआयुक्त डॉ. बाबुराव बिक्कड, नगरपालिका मुख्याधिकारी महेंद्र वाघमोडे आदी उपस्थित होते.
#वाशिम #कारंजा #पाणीटंचाई #पाणीबचत #जलव्यवस्थापन #जिल्हा_प्रशासन #जिल्हा_माहिती_कार्यालय_वाशिम
0 Response to "कारंजा शहरातील पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजनांचा आराखडा तयार करा"
Post a Comment