लोकशाही मानली जाते. ही लोकशाही केवळ संविधानावर आधारित नसून ती निवडणुकांच्या प्रक्रियेद्वारे जिवंत ठेवली जाते.
साप्ताहिक सागर आदित्य
विशेष लेख
शिक्षक’ निवडणूकीची मतमोजणी
भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. ही लोकशाही केवळ संविधानावर आधारित नसून ती निवडणुकांच्या प्रक्रियेद्वारे जिवंत ठेवली जाते. लोकशाही म्हणजे केवळ मतदान करणे नव्हे, तर ती एक जीवनपद्धती आणि शासनप्रणाली आहे. अब्राहम लिंकन यांच्या शब्दात सांगायचे तर, "लोकांनी, लोकांच्या हितासाठी, चालवलेले लोकांचे राज्य म्हणजे लोकशाही." या लोकशाहीचा एक भाग म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणुक आता अंतिम टप्प्यात आली आहे. अमरावती विभागातील ५ जिल्ह्यातील ८१ मतदान केंद्रावर शुक्रवारी २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या कालावधीत मतदान प्रक्रिया पार पडली. विभागातील एकूण ३३ हजार ३४ मतदारांनी म्हणजेच ९२.२५ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. आता मंगळवारी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी अमरावती येथील लोकशाही भवनात मतमोजणीची प्रक्रीया होणार आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून २६ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. शिक्षक मतदारसंघाची निवडणूक यंत्रणा मतमोजणीसाठी सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर ही निवडणूक नेमकी कशी असते, मतमोजणीची प्रक्रिया कशी राबवली जाते हे समजून घेणे महत्वाचे आणि तेवढेच रंजक सुध्दा आहे.
मतपेट्या स्टॉंगरूममधून बाहेर आणून त्या-त्या टेबलवर सील उघडून रितसर मतपत्रिकांचे गठ्ठे बनवले जातात. मतमोजणी अधिकाऱ्यांकडून वैधतेसंबंधित शंकास्पद/संदिग्ध मतपत्रिका अंतिम निर्णयाकरीता सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले जातात. याप्रमाणे वैध मतपत्रिकांचे पसंतीक्रमानूसार आवश्यक गठ्ठे बनवले जातात.
प्रत्यक्ष आकड्यांसह मतमोजणी कशी होते, हे आपण एका सोप्या काल्पनिक उदाहरणाद्वारे समजावून घेऊया.
समजा, एका शिक्षक मतदारसंघात मतदानामध्ये एकूण १०,००० वैध मते (Valid Votes) पडली आहेत आणि निवडणुकीच्या रिंगणात ४ उमेदवार उभे आहेत (अ, ब, क आणि ड).
*पायरी १: विजयासाठीचा कोटा (Quota) ठरवणे.*
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत जिंकण्यासाठी किती मते (कोटा) लागतात, हे काढण्यासाठी झालेल्या मतदानातील एकूण वैध मतांना २ ने भागणे आणि त्यात १ मिळवणे. हे सुत्र कोटा निश्चित करण्यासाठी वापरले जाते.
याचा अर्थ, वरील उदाहरणात ज्या उमेदवाराला विजयाची माळ गळ्यात पडायची असेल, त्याला किमान ५,००१ मते मिळवणे बंधनकारक ठरते. हा कोटा निश्चित केला जातो.
*पायरी २: पहिली फेरी - पहिल्या पसंतीची (First Preference) मते मोजणे.*
पहिल्या फेरीत फक्त आणि फक्त 'पसंती क्रमांक १' (First Preference) ची मते मोजली जातात. समजा, पहिल्या फेरीत सर्व उमेदवारांना मिळालेली मते अशी आहेत:
उमेदवार 'अ' : ४,००० मते
उमेदवार 'ब' : ३,००० मते
उमेदवार 'क' : २,००० मते
उमेदवार 'ड' : १,००० मते
एकूण वैध मते : १०,०००
निकालाचे विश्लेषण : विजयासाठी ५,००१ मते हवी आहेत; पण पहिल्या फेरीत सर्वाधिक ४,००० मते मिळवूनही 'अ' उमेदवार ५,००१ च्या कोट्यापर्यंत पोहोचू शकलेला नाही. त्यामुळे पहिल्या फेरीत कोणीही विजयी ठरत नाही. आता दुसरी फेरी सुरू होते.
*पायरी ३: दुसरी फेरी - सर्वात कमी मते असलेल्या उमेदवाराला बाद ठरवणे*
दुसऱ्या फेरीत ज्या उमेदवाराला सर्वात कमी 'पसंती क्रमांक १' ची मते मिळाली आहेत, त्याला शर्यतीतून बाहेर (Eliminate) केले जाते.
इथे उमेदवार 'ड' याला सर्वात कमी म्हणजेच १,००० मते मिळाली आहेत. त्यामुळे 'ड' बाद केला जातो.
जर एकापेक्षा जास्त उमेदवारांना समसमान कमी मते मिळाली असतील तर पुढील लगतच्या फेरीत कमी मते पडली असतील त्या उमेदवाराला बाद करण्यात येते.
आता 'ड' ला मिळालेल्या त्या १,००० मतपत्रिका तपासून पाहिल्या जातात की, त्या मतदारांनी 'पसंती क्रमांक २' (Second Preference) कोणाला दिला आहे ?
समजा, 'ड' च्या त्या १,००० मतपत्रिकांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे झाले:
त्यातील ६०० मतदारांनी त्यांच्या पसंतीक्रमात दुसरा क्रमांक 'अ' ला दिला होता.
त्यातील ३०० मतदारांनी दुसरा क्रमांक 'ब' ला दिला होता.
उरलेल्या १०० मतपत्रिकांवर दुसरा पसंतीक्रम नव्हता किंवा तो अवैध (Invalid) ठरला.
आता ही मते संबंधित उमेदवारांच्या खात्यात जोडली जातात:
उमेदवार 'अ': ४,००० + ६०० (नवीन मते) = ४,६०० मते
उमेदवार 'ब': ३,००० + ३०० (नवीन मते) = ३,३०० मते
उमेदवार 'क': २,००० मते (जैसे थे)
स्थिती: अजूनही कोणालाही ५,००१ चा कोटा मिळालेला नाही ('अ' कडे ४,६०० मते आहेत). त्यामुळे मोजणी तिसऱ्या फेरीत जाते.
पायरी ४ : तिसरी फेरी-अतिशय महत्त्वाची फेरी
तिसऱ्या फेरीत आता उरलेल्या उमेदवारांपैकी ज्याला सर्वात कमी मते आहेत, त्याला बाहेर काढले जाईल.
आता उमेदवार 'क' कडे सर्वात कमी २,००० मते आहेत, त्यामुळे 'क' ला शर्यतीतून बाहेर केले जाते.
आता 'क' च्या त्या २,००० मतपत्रिका तपासल्या जातात आणि पाहिलं जातं की, त्यांच्यावर पुढचा पसंतीक्रम (उदा : दुसरा किंवा तिसरा) कोणाचा आहे.
समजा, 'क' च्या त्या २,००० मतांपैकी:
१,२०० मतांमध्ये पुढची पसंती 'अ' कडे गेलेली आढळली.
५०० मतांमध्ये पुढची पसंती 'ब' कडे गेलेली आढळली.
३०० मते दुसऱ्या कोणालाच पसंती न दिल्याने बाद झाली.
आता ही मते 'अ' आणि 'ब' च्या खात्यात जमा होतात:
उमेदवार 'अ': ४,६०० + १,२०० = ५,८०० मते
उमेदवार 'ब': ३,३०० + ५०० = ३,८०० मते
*अंतिम निकाल:*
आवश्यक असलेला ५,००१ चा कोटा 'अ' ने पार केला आहे! परिणामी, उमेदवार 'अ' ला विजयी घोषित केले जाते.
या आकडेवारीवरून काय स्पष्ट होते?
पहिल्या फेरीत 'अ' कडे फक्त ४,००० मते होती आणि 'ब' कडे ३,०००, तरीही पसंतीक्रमाच्या मतदानामुळे आणि मते हस्तांतरीत (Transfer) झाल्यामुळे 'अ' चा विजय सुकर झाला. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत म्हणूनच प्रत्येक पसंतीचा (१, २, ३...) कागद आणि मत अत्यंत महत्त्वाचे ठरते. हे विशेष.
एखादा उमेदवार पहिल्या पसंतीचा मतांचा कोटा पूर्ण करू न शकल्यास जेवढी पसंतीक्रमाची मते असतात तेवढी सारी मते मोजावी लागतात. तेवढे करूनही उमेदवाराला मतांचा कोटा पूर्ण करता आला नाही तर सर्व मतांची मोजणी होऊन सर्वाधिक मते मिळालेला उमेदवार विजयी घोषित केला जातो. ही मतमोजणीची प्रक्रीया अधिक वेळ लागणारी आणि तेवढीच सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचवणारी आहे. परिस्थितीनूसार यामुळे मतमोजणी प्रक्रीयेला बराच वेळ लागू शकतो. यात शंकाच नाही.
▪️अनिल आलुरकर उपसंचालक (माहिती)
विभागीय माहिती कार्यालय, अमरावती.
0 Response to "लोकशाही मानली जाते. ही लोकशाही केवळ संविधानावर आधारित नसून ती निवडणुकांच्या प्रक्रियेद्वारे जिवंत ठेवली जाते."
Post a Comment