सोयाबीन व तूर कुटार जनावरांच्या चाऱ्यासाठी प्राधान्याने राखीव ठेवा!
साप्ताहिक सागर आदित्य
सोयाबीन व तूर कुटार जनावरांच्या चाऱ्यासाठी प्राधान्याने राखीव ठेवा!
📢 जिल्हाधिकाऱ्यांचे सुधारित आदेश जारी
🔹 उद्योजकांना ५०% साठा राखीव ठेवणे बंधनकारक
🔹 अवैध साठेबाजीला प्रतिबंध
वाशिम, : जिल्ह्यातील पशुधनाला मुबलक चारा उपलब्ध व्हावा आणि संभाव्य चारा टंचाईवर मात करता यावी, या उद्देशाने जिल्हादंडाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सोयाबीन व तूर पिकांच्या कुटाराच्या (वैरण) वापर व विक्रीबाबत सुधारित आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार जिल्ह्यातील कुटार हे मुख्यत्वे जनावरांच्या चाऱ्यासाठी राखीव ठेवण्यात आले असून, गट्टू (बायोमास ब्रिकेट्स/पेलेट्स) निर्मिती उद्योगांना प्रशासनाच्या मार्गदर्शनाखालीच खरेदी व वापर करता येणार आहे.
📌 आदेशातील मुख्य तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत :
🔸 पशुधन नसलेले शेतकरी :
ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःची जनावरे नाहीत, त्यांनी कुटार विकताना सर्वप्रथम आपल्या परिसरातील पशुपालक शेतकऱ्यांना वैरण म्हणून देण्यास प्राधान्य द्यावे. त्यानंतरच उर्वरित कुटार बायोमास ब्रिकेट्स/पेलेट्स निर्मिती उद्योगांना किंवा इतर व्यवसायांना द्यावे.
🔸पशुधन असलेले शेतकरी :
ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःचे पशुधन आहे, त्यांनी सर्वप्रथम आपल्या जनावरांसाठी वर्षभराच्या चाऱ्याची पुरेशी सोय करावी. त्यानंतरच शिल्लक कुटार विक्रीसाठी उपलब्ध करावे. मात्र, असा चारा विकणाऱ्या शेतकऱ्यांना भविष्यात शासनाच्या चारा वाटप योजनेचे निर्बंध लागू राहतील. याबाबतचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र तालुका पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक असेल.
🔸 अन्यथा शासकीय चारा योजनेचा लाभ बंद :
आपले कुटार/चारा गट्टू (बायोमास ब्रिकेट्स) निर्मिती किंवा इतर उद्योगांना विकणाऱ्या शेतकऱ्यांना भविष्यात शासनाच्या वैरण/चारा वाटप योजनेचा लाभ मिळणार नाही.
🔸 उद्योजकांना ५०% साठा राखीव ठेवणे बंधनकारक :
बायोमास ब्रिकेट्स व पेलेट्स निर्मिती करणाऱ्या उद्योजक समूहाने त्यांच्याकडे दररोज येणाऱ्या एकूण कुटारापैकी किमान ५०% साठा शासनाच्या आवश्यकतेनुसार शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवणे अनिवार्य आहे. या राखीव साठ्याची (स्टॉक) माहिती दर आठवड्याला संबंधित तहसीलदार आणि तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास अधिकाऱ्यांकडे सादर करावी लागेल.
🔸चारा टंचाई स्थितीतील नियम :
जिल्ह्यात भविष्यात चारा टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यास गट्टू/ब्रिकेट्स उद्योगांकडील राखीव व उपलब्ध चारा/कुटार प्रशासनाच्या चारा टंचाई उपाययोजनांसाठी ताब्यात घेतला जाईल.
⚠️ जिल्ह्यात कुटाराची अवैध साठेबाजी किंवा कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
#जिल्हा_प्रशासन_वाशिम #दुष्काळनिवारण
#उपाययोजना
0 Response to "सोयाबीन व तूर कुटार जनावरांच्या चाऱ्यासाठी प्राधान्याने राखीव ठेवा!"
Post a Comment