पाण्याची टंचाई जाणवू नये, यासाठी पाणीपुरवठा योजनांची सद्यस्थिती तपासून
साप्ताहिक सागर आदित्य
संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा योजनांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी!
🚰 जलजीवन मिशनच्या कामांचा घेतला आढावा; पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रभावी नियोजनाचे निर्देश
वाशिम, : संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये, यासाठी पाणीपुरवठा योजनांची सद्यस्थिती तपासून आवश्यक उपाययोजनांचे प्रभावी नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या वाशिम तालुक्यातील तामसी व मालेगाव तालुक्यातील पांगरी कुटे आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत येणाऱ्या रेगाव व मुंगळा येथे जलजीवन मिशनच्या रेट्रोफीटींगच्या कामांची पाहणी करून योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता महेश कान्हेरकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता नितीन उपरेलू, वाशिम तहसीलदार निलेश पळसकर, मालेगाव गटविकास अधिकारी निकेश पाटील, नायब तहसीलदार रंजना गोरे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कुंभेजकर पुढे बोलताना म्हणाले, संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, सुरू असलेल्या योजनांची स्थिती आणि त्यांच्या कार्यक्षमतेची पडताळणी करणे आवश्यक आहे. पाणीपुरवठ्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन संबंधित यंत्रणांनी वेळीच उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
जलजीवन मिशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला पुरेसे आणि नियमित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने योजनांची अंमलबजावणी महत्त्वपूर्ण आहे. आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी पाणीपुरवठा व्यवस्थेचे नियोजन आणि देखभाल यांना प्राधान्य देण्याची गरज या पाहणीच्या निमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांनी अधोरेखित केली.
संबंधित उपअभियंता व ग्रामस्थांचीही यावेळी उपस्थिती होती.
💧 पाण्याचे योग्य नियोजन, योजनांची नियमित देखभाल आणि वेळीच उपाययोजना — संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज !
#जलजीवनमिशन #पाणीपुरवठा #संभाव्यदुष्काळ #पाणीटंचाईनियोजन #वाशिम
#दुष्काळ_निवारण
0 Response to "पाण्याची टंचाई जाणवू नये, यासाठी पाणीपुरवठा योजनांची सद्यस्थिती तपासून"
Post a Comment