पावसाच्या मोठ्या खंडामुळे पीक परिस्थितीची शिवारात प्रत्यक्ष पाहणी
साप्ताहिक सागर आदित्य
शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आमदार व जिल्हाधिकारी
पावसाच्या मोठ्या खंडामुळे पीक परिस्थितीची शिवारात प्रत्यक्ष पाहणी
वाशिम, : पावसाने दिलेल्या मोठ्या खंडामुळे जिल्ह्यातील पीक परिस्थिती गंभीर बनली असून, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आज दि.११ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि आमदार श्याम खोडे यांनी वाशिम तालुक्यातील सावरगाव बर्डे, तामसी आणि पंचाळा गावांना भेट देऊन शेतशिवाराची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, वाशिम तहसीलदार निलेश पळसकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा, तालुका कृषी अधिकारी अतुल जावळे, ग्राम महसूल अधिकारी प्रिया इंगोले, रेणूका ईढोळे यांच्यासह कृषी सहायक,ग्रामसेवक यावेळी उपस्थित होते.
वाशिम जिल्ह्यातील केवळ ३० टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे. त्यामुळे शेती मोठ्या प्रमाणात पावसावर अवलंबून आहे. गेल्या जवळपास महिनाभरापासून पावसाचा खंड पडल्याने पिकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी या कठीण परिस्थितीत घाबरून न जाता थोडा संयम बाळगणे आवश्यक आहे. प्रशासनाकडून पीक परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ आढावा घेतला जात आहे. या परिस्थितीचा सामना आपण सर्वजण एकजुटीने आणि समन्वयाने करूया. शेतकऱ्यांनी काळजी करू नये, शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन आमदार श्याम खोडे यांनी केले.
पीक नुकसानीची योग्य नोंद होण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी प्रक्रियेत आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची अचूक नोंद केल्यास पीक नुकसानीपोटी शासनाकडून मदत देण्याच्या प्रक्रियेत त्याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या पिकाची नोंद वेळेत आणि अचूकपणे करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ग्रामस्थ शेतकरी,सरपंच, पोलिस पाटील उपस्थित होते.
#वाशिम #शेतकरी #पीकपरिस्थिती #पावसाचाखंड #ईपीकपाहणी #शेतकऱ्यांच्याबांधावर #कृषी #जिल्हाप्रशासन #शेतकरीहित #Washim
0 Response to "पावसाच्या मोठ्या खंडामुळे पीक परिस्थितीची शिवारात प्रत्यक्ष पाहणी"
Post a Comment