काही क्षण असे असतात, जे टाळ्यांच्या आवाजातही रडवतात आणि काही कथा अशा असतात, ज्या सांगताना शब्द आणि श्वासही थरथरतात.
साप्ताहिक सागर आदित्य
..काळजाचा ठोका चुकवणारी शहादत!
काही क्षण असे असतात, जे टाळ्यांच्या आवाजातही रडवतात आणि काही कथा अशा असतात, ज्या सांगताना शब्द आणि श्वासही थरथरतात.
वाशिम जिल्हा परिषदेकडून आयोजित अधिकारी-कर्मचारी क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक महोत्सवाचा पहिला दिवस. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते स्पर्धांचा शुभारंभ झाला आणि लगेच विविध संघांच्या झाक्यांची मिरवणूक सुरू झाली. प्रत्येक झाकी आपापल्या विषयात रंगतदार… पण एक झाकी अशी होती, जिने अख्ख्या मैदानाचं हसू एका क्षणात गिळून टाकलं.
गटविकास अधिकारी रवींद्र सोनोने यांच्या नेतृत्वात पंचायत समिती वाशिमच्या खेळाडूंनी सादर केलेली झाकी... शहीद जवान अमोल गोरे यांच्या बलिदानाची गाथा.
यात सहभागी असलेल्या सर्व कलावंत कर्मचाऱ्यांनी अत्यंत जीव ओतून अभिनय सादर केला होता.
झाकीच्या माध्यमातून दृश्य उभे राहते.
सुट्टीवर गावी आलेला जवान. आई-वडिलांचा आधार आणि पत्नीच्या डोळ्यातला अभिमान. दोन चिमुकल्या निरागस मुलांचा बाप. त्यांचा काही दिवसांचा छोटा संसार... साधा, शांत, पण सोन्यासारखा.
आणि मग अचानक कर्तव्याची हाक. कुटुंबाचा निरोप घेऊन... आपल्या आई-वडिलांच्या आठवणी, दोन गोड चिमुकल्या मुलांचे गोंडस हसू आणि पत्नीचा आतुरलेला चेहरा डोळ्यात साठवून जवान कर्तव्यावर निघून जातो.
दृश्य बदलतं.
टीव्ही स्क्रीनवर बातमी झळकते...
“देशाच्या सीमेवर झालेल्या चकमकीत वाशिमचा सुपुत्र अमोल गोरे शहीद.”
क्षणात सगळे स्तब्ध होतात.
तिरंग्यात गुंडाळलेली शवपेटी.
आई-वडिलांचा आक्रोश.
पत्नीचा धाय मोकलून फुटलेला जीव. शव पेटीतील बाबांना बघून "आई बाबा का उठत नाहीत" अशी मुलांनी मारलेली आर्त हाक सगळ्यांच्याच काळजाला चिरून जाते.
उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा ओलावतात. बंदुकीच्या फैरीत शहीद अमोल गोरे यांना अखेरची सलामी दिली जाते...
झाकी संपते, मैदान टाळ्यांनी दुमदुमतं.
पण…
तेवढ्यात अँकरचा आवाज काळजाचा ठोका चुकवतो.
“आज ज्या शहीद अमोल गोरे यांच्या शौर्याला आदरांजली वाहण्यात आली, त्यांच्या पत्नी आणि दोन लहान मुलं इथे, या स्टेजवर उपस्थित आहेत.” त्या क्षणी टाळ्या थांबतात, श्वास अडकतो,
डोळे भरून येतात.
ज्या वेदनेचा अभिनय पाहिला, ती वेदना प्रत्यक्ष समोर उभी असते.
ती पत्नी, जिचं आयुष्य एका बातमीने बदललं.
ती मुलं, ज्यांचं बालपण कायमचं पोरकं झालं.
कार्यक्रमात उपस्थित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांच्या हस्ते शहीद गोरे यांच्या पत्नी वैशाली अमोल गोरे दोन चिमुकले मुलं (अंदाजे पाच आणि सात वर्ष वयाची) यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सत्कार स्वीकारताना वैशाली ताईंचा हुंदका आतच दाटला होता.
कार्यक्रम संपला पण आठवणी काही संपत नाहीत...
शहीद अमोल गोरे आज फक्त एका झाकीत नव्हते.
ते प्रत्येक ओलावलेल्या डोळ्यात होते.
प्रत्येक थरथरणाऱ्या टाळीत होते.
ते प्रत्येकाच्या मनात एकच विचार सोडून गेले,
"देशासाठी शहीद होणं वीरतेचं शिखर आहे पण त्या वीराच्या कुटुंबासोबत उभं राहणं, ही खरी देशभक्ती आहे."
शब्दांकन: राम श्रृंगारे
0 Response to "काही क्षण असे असतात, जे टाळ्यांच्या आवाजातही रडवतात आणि काही कथा अशा असतात, ज्या सांगताना शब्द आणि श्वासही थरथरतात."
Post a Comment