चिमुकल्यांच्या कलागुणांना उधाण; वाशिममध्ये जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचा जल्लोषात प्रारंभ
साप्ताहिक सागर आदित्य
चाचा नेहरू बाल महोत्सव बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी एक प्रभावी व्यासपीठ
आरडीसी विश्वनाथ घुगे
चिमुकल्यांच्या कलागुणांना उधाण; वाशिममध्ये जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचा जल्लोषात प्रारंभ
क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन
चाचा नेहरू बाल महोत्सव बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ असून मुलांच्या अंगी असलेली कला, कल्पकता आणि आत्मविश्वास यांना योग्य दिशा मिळाल्यास ते समाजाचे सक्षम नागरिक घडतात. अशा उपक्रमांतून मुलांना स्वतःला व्यक्त करण्याची, आपली ओळख निर्माण करण्याची आणि संघभावनेने काम करण्याची संधी मिळते,असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी केले.
बालकांमधील सुप्त कलागुणांना वाव देत त्यांच्यात आत्मविश्वास, बंधुभाव व सांघिक भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने वाशिम येथे जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे उद्घाटन दि. १५ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा डॉ. अलका मकासरे होत्या. यावेळी डॉ. मंजुश्री जांभरुणकर, जिल्हा क्रीडा अधिकारी किशोर बोंडे, नवोदय विद्यालयाचे प्राचार्य सचिन खरात, विधी अधिकारी महेश महामुने,ॲड. अनिल उंडाळ, परिविक्षाधिन अधिकारी निवृत्ती जटाळे, महिला व बाल संरक्षण अधिकारी महादेव जवळकर, परिविक्षाधीन अधिकारी, गजानन पडघान आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात डॉ. अलका मकासरे यांनी बालकांचे हक्क, संरक्षण व सर्वांगीण विकास यावर भर दिला. शासनाच्या विविध बालकल्याण योजना आणि समाजाच्या सहकार्यामुळे अनाथ, निराधार व गरजू बालकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडत असून, या महोत्सवामुळे त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक बालकात असलेली प्रतिभा उजागर करणे हेच या उपक्रमाचे खरे यश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.बालकांना समाजमाध्यमांपासून परावृत्त करावेत असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी उत्तम शिंदे यांनी केले. त्यांनी चाचा नेहरू बाल महोत्सवाच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकत बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, बालसंगोपन व पुनर्वसन उपक्रमांची माहिती दिली. अनाथ, निराधार व गरजू बालकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे हेच या महोत्सवाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.बोंडे यांनीही मनोगत व्यक्त केले.ते म्हणाले, अभ्यासासोबतच खेळ खेळही महत्त्वाचा आहे जेणेकरून बालकांचा सर्वांगीण विकास होईल आणि ते सक्षम नागरिक बनतील.
तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून बालकांनी त्यामध्ये उत्स्फूर्त सहभागासाठी बालसुलभ उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्पर्धांमधून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बालकांना पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे.
चाचा नेहरू यांच्या बालप्रेमी विचारांना साजेशा वातावरणात साजरा होणारा हा महोत्सव वाशिम जिल्ह्यातील बालकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला नवी दिशा देणारा उपक्रम म्हणून ओळख निर्माण करीत आहे. कार्यक्रमाला परिविक्षाधीन अधिकारी गणेश ठाकरे,प्रकल्प सहयोगी नीलिमा भोंगाडे, विधी सल्लागार जिनसाजी चौधरी आदींसह महिला व बालविकास, चाईल्ड हेल्पलाइनच्या अधिकारी व कर्मचारी, तालुका संरक्षण अधिकारी आदींनी पुढाकार घेतला. संचालन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी भगवान ढोले यांनी केले.
0 Response to "चिमुकल्यांच्या कलागुणांना उधाण; वाशिममध्ये जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचा जल्लोषात प्रारंभ"
Post a Comment