साखरा जि.प. उच्च प्राथमिक शाळेला जिल्हाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट
साप्ताहिक सागर आदित्य
शैक्षणिक गुणवत्ता, स्वच्छता आणि शिक्षकांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे
जिल्हाधिकारी कुंभेजकर
साखरा जि.प. उच्च प्राथमिक शाळेला जिल्हाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट
गुणवत्तापूर्ण शिक्षण ही ग्रामीण विकासाची खरी पायाभरणी आहे. शाळेतील शिक्षकांनी घेतलेली मेहनत आणि विद्यार्थ्यांची जिज्ञासा पाहता ही शाळा निश्चितच जिल्ह्यासाठी आदर्श आहे. हे आज या शाळेत भेट घेतांना मला जाणवले असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
पुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले,विद्यार्थ्यांनी रोज वाचनाची सवय लावणे अत्यंत आवश्यक आहे. वाचन ही केवळ सवय नसून व्यक्तिमत्त्व घडविणारी शक्ती आहे. प्रत्येक मुलाने पुस्तकांशी मैत्री केली पाहिजे.
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, साखरा येथे आज जिल्हाधिकारी श्री .कुंभेजकर यांनी प्रत्यक्ष भेट देत शैक्षणिक, प्रशासकीय आणि भौतिक सुविधांची सर्वांगीण पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.
शाळेतील वर्गव्यवस्था, अध्यापन पद्धती, विद्यार्थी गुणवत्ता तसेच परिसरातील स्वच्छता आणि सौंदर्यीकरण याबद्दल त्यांनी विशेष समाधान व्यक्त केले.
परीक्षणादरम्यान जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांनी प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती जाणून घेतली आणि शिक्षकांकडून अध्यापनातील नवकल्पना व उपक्रमांची माहिती घेतली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निरंतर वाचनाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले की ,विद्यार्थी वृत्तपत्रे, संदर्भग्रंथ, विविध लेखकांची पुस्तके नियमित वाचतील याकडे विशेष लक्ष द्यावे. वाचनाद्वारे विचारक्षमता, भाषिक कौशल्य आणि आत्मविश्वास वाढीस लागतो, असे त्यांनी सांगितले.
पुढे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, गुणवत्ता वृद्धीसाठी शिक्षकांनी घेतलेले प्रयत्न, उपक्रमशीलता आणि विद्यार्थ्यांना घडविण्यासाठीची निष्ठा पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षकांचे मनापासून कौतुक केले. गुणवत्तापूर्ण शिक्षण हीच खरी बदलाची गुरुकिल्ली असून या शाळेत ते कार्य सातत्याने आणि प्रभावीपणे राबविले जात आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
यादरम्यान जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय ससाने आणि उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी संपूर्ण शैक्षणिक प्रक्रिया, विद्यार्थ्यांची उपस्थिती, उपक्रम राबविण्याची पद्धत, संसाधनांचा वापर आणि प्रशासनिक नोंदींची तपासणी केली. शाळेच्या टीमवर्कचे कौतुक करत, भावी कामकाजासाठी आवश्यक त्या सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन त्यांनी दिले.
शाळेच्या एकूण प्रगतीबाबत समाधान व्यक्त करत जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी पुढील वाटचालीसाठी शिक्षक व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
ग्रामीण भागातील शाळांनी उभारलेला गुणवत्ता विकासाचा आदर्श इतरांसाठी प्रेरणादायी आहे, असेही ते म्हणाले.
साखरा विद्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीमुळे शिक्षक-विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शाळेच्या शैक्षणिक कार्यात नवे बळ संचारल्याची भावना सर्वांमध्ये उमटली.
यावेळी मुख्याध्यापकांसह शाळेतील सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
0 Response to "साखरा जि.प. उच्च प्राथमिक शाळेला जिल्हाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट"
Post a Comment