प्रशासकीय इमारतीतील विविध विभागांच्या कामकाजाची पाहणी व आढावा
साप्ताहिक सागर आदित्य
नागरिकाभिमुख प्रशासनाची दिशा निश्चित; सुधारणा हा पुढचा टप्पा गाठण्याची वेळ
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
प्रशासकीय इमारतीतील विविध विभागांच्या कामकाजाची पाहणी व आढावा
बरेचदा आपल्या कार्यालयात अनेक व्हिजिटर्स येतात. प्रत्येक नागरिक आपल्या काहीतरी अपेक्षेसह इथे येतो. त्यांच्या अडचणी कमी करणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आणि वेळेवर सेवा देणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. कार्यालयीन व्यवस्थापन सुटसुटीत व पारदर्शक असेल, तर नागरिकांचा विश्वास वाढतो आणि प्रशासनाचा दर्जाही उंचावतो. आवश्यक त्या सुधारणा हा पुढचा टप्पा आहे आणि तो गाठण्यासाठी प्रत्येक विभागाने आपली कार्यपद्धती अधिक शिस्तबद्ध ठेवणे आवश्यक आहे.
असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील विविध विभागांना आज दि.२४ नोव्हेंबर रोजी अचानक भेट देत जिल्हाधिकाऱ्यांनी कामकाजाची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.
नागरिकांना अधिक सक्षम, पारदर्शक आणि तत्पर सेवा मिळाव्यात, कार्यालयीन प्रक्रियेत गती यावी तसेच अनावश्यक विलंबाला आळा बसावा या उद्देशाने त्यांनी विभागातील दैनंदिन कार्यपद्धतीचा प्रत्यक्ष आढावा घेतला.
पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक विभागात भेट देऊन अधिकाऱ्यांशी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून प्रलंबित प्रकरणांची स्थिती, नोंदींचे व्यवस्थापन, कार्यवाटप, कार्यालयीन शिस्त,जॉबचार्ट आणि नागरिकसेवेतील आव्हाने याबाबत माहिती घेतली.
विशेषतः तक्रार निवारण, परिपत्रके अंमलबजावणी, जमीन अभिलेख, आपत्ती व्यवस्थापन, सर्वसाधारण प्रशासन, निवडणूक शाखा, आपत्ती कक्ष, कृषी , महिला व बालविकास, सैनिक कल्याण नगरपालिका प्रशासन, अभिलेखागार इत्यादी विभागांमधील कामकाजाची त्यांनी सखोल तपासणी केली.
जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांनी कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापर, कागदपत्रांमध्ये सुव्यवस्था, ऑनलाइन सेवांचा विस्तार आणि नागरिकांना सेवा देताना वेळेचे काटेकोर पालन करण्यावर भर देण्याचे निर्देश दिले. कार्यालयीन परिसर स्वच्छ, शिस्तबद्ध आणि कागदपत्रे नीटपणे उपलब्ध होण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचेही सांगितले.
या पाहणीदरम्यान अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विभागनिहाय कामकाज, आव्हाने आणि उपलब्ध आवश्यक संसाधनांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली.
जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी कर्मचाऱ्यांना नागरिकाभिमुख दृष्टीकोन ठेवण्याचे, समस्या तातडीने निकाली काढण्याचे आणि प्रत्येक कामात पारदर्शकता राखण्याचे निर्देश देत
गरजेनुसार विभागांना सुधारात्मक नियोजन करून अहवाल सादर करण्यासही यावेळी सांगितले.
0 Response to "प्रशासकीय इमारतीतील विविध विभागांच्या कामकाजाची पाहणी व आढावा "
Post a Comment