नगरपालिका, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीसंबंधीच्या तयारीचा सखोल आढावा
साप्ताहिक सागर आदित्य
मतपत्रिका, पोस्टल मतपत्रिका व मनुष्यबळ व्यवस्थापनावर सविस्तर सादरीकरण
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी घेतला आढावा
नगरपालिका, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीसंबंधीच्या तयारीचा सखोल आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज दि. ६ नोव्हेंबर रोजी बैठक पार पडली. या बैठकीत मतपत्रिका (बॅलेट पेपर), पोस्टल मतपत्रिका (पोस्टल बॅलेट)तसेच मनुष्यबळ व्यवस्थापन या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर सादरीकरण करण्यात आले.
या बैठकीस अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी विरेंद्र जाधव, नगरपालिका प्रशासन सहआयुक्त बी.डी. बिक्कड, जिल्हा खनिकर्म अधिकारी विनय राठोड, नगरपालिका प्रशासन सहाय्यक आयुक्त परदेशी, शिक्षणाधिकारी संजय ससाणे, उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव आदी जिल्हास्तरीय नोडल अधिकारी उपस्थित होते.
सादरीकरण श्री. पुंडे व श्री. परदेशी यांनी केले. या सादरीकरणामध्ये मतपत्रिकांच्या छपाई, वितरण, सुरक्षित साठवणूक, तसेच पोस्टल मतपत्रिकांच्या वितरण व प्राप्ती प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. मतदानाच्या दिवशी सर्व मतपत्रिका वेळेत उपलब्ध व्हाव्यात, वाहतूक व सुरक्षा व्यवस्था चोख राहावी यासाठी आवश्यक नियोजन सादर करण्यात आले.
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना नियोजनबद्ध कामकाज, अचूकता आणि पारदर्शकता राखण्याच्या सूचना दिल्या. पोस्टल मतपत्रिकांच्या संदर्भात वेळेत अर्ज स्वीकृती, वितरण आणि सुरक्षित साठवणुकीबाबत विशेष दक्षता घेण्याचे निर्देश दिले.
मनुष्यबळ व्यवस्थापनासंबंधी मतदान केंद्रांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, कार्यविभाजन, जबाबदाऱ्या तसेच समन्वय यावरही चर्चा झाली. प्रत्येक अधिकाऱ्याने जबाबदारीने आणि संवेदनशीलतेने काम करावे, मतदारांना सुकर, सुरक्षित व पारदर्शक मतदानाचा अनुभव मिळावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
बैठकीच्या शेवटी जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी सांगितले की, रॅन्डमायजेशन प्रक्रियेमुळे मतदान केंद्रांवर नेमले जाणारे अधिकारी आणि कर्मचारी हे पूर्णपणे संगणकीय पद्धतीने ठरवले जात असल्याने निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि निष्पक्षता सुनिश्चित होते. त्यांनी या प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना विशेष दक्षता घेण्याचे निर्देश दिले.सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी दुरदृष्यप्रणालीव्दारे उपस्थित होते.
0 Response to "नगरपालिका, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीसंबंधीच्या तयारीचा सखोल आढावा"
Post a Comment