
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांची मुसळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट व पाहणी
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांची मुसळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट व पाहणी
वाशिम, दि. १ ऑक्टोबर जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी मालेगाव तालुक्यातील मुसळवाडी येथील दौऱ्यात आयुष्मान भारत प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन सविस्तर पाहणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य सेवांची गुणवत्ता, सुविधा आणि रुग्णसेवा याबाबत प्रत्यक्ष माहिती घेतली.
यावेळी अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, उपजिल्हाधिकारी विरेंद्र जाधव, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार दीपक पुंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ संतोष बोरसे उपस्थित होते.
या पाहणीदरम्यान त्यांनी नोंदणी कक्ष, शल्यगृह, प्रयोगशाळा, ड्रेसिंग रूम तसेच महिला वार्ड यांचा आढावा घेतला. आरोग्य केंद्रात उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा व वैद्यकीय यंत्रणांची कार्यप्रणाली तपासून पाहिली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष बियाणी व आशा यादव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केंद्रातील चालू कामकाज, उपचार व्यवस्था, तसेच रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवांची सविस्तर माहिती दिली.
जिल्हाधिकारी श्री .कुंभेजकर यांनी आरोग्य सेवांमध्ये गुणवत्तेवर भर देण्याचे तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर आणि प्रभावी आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
आरोग्य केंद्रात रुग्णांना वेळेवर औषधे व आवश्यक तपासण्या उपलब्ध करून द्याव्यात.स्वच्छतेकडे विशेष लक्ष देऊन रुग्णालय परिसर नेहमी स्वच्छ व आरोग्यदायी ठेवावा. असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.
महिला व बालरुग्णांच्या उपचारांमध्ये कोणतीही तडजोड होऊ नये.तातडीच्या रुग्णसेवेकरिता आवश्यक उपकरणे व सुविधा सदैव कार्यरत ठेवाव्यात.
आरोग्य कर्मचारी व आशा कार्यकर्त्यांनी गावपातळीवर आरोग्य जनजागृतीसाठी प्रयत्न वाढवावेत.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णसेवा हीच खरी प्राथमिकता असल्याचे सांगून ग्रामीण भागातील लोकांना उत्कृष्ट वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले.
0 Response to "जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांची मुसळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट व पाहणी"
Post a Comment