
गणरायाच्या उत्सवातून संस्कृती व सामाजिक बांधिलकी जपुया* *जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर*
गणरायाच्या उत्सवातून संस्कृती व सामाजिक बांधिलकी जपुया
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
महागणेशोत्सवानिमित्त वाशिममध्ये सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न
वाशिम, गणरायाचा उत्सव हा धार्मिक सोहळा समाजातील एकात्मता, बंधुभाव आणि सांस्कृतिक वारसा जपण्याची मोठी संधी आहे. या निमित्ताने होणाऱ्या विविध कलात्मक सादरीकरणांतून सामाजिक जाणीवा, पर्यावरण संवर्धन व संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले जाणार आहे. राज्य सरकारने गणेशोत्सवास राज्यउत्सवाचा दर्जा दिला आहे, ही अभिमानाची बाब असून यातून परंपरेसोबतच आधुनिक सामाजिक मूल्ये जपण्याचा संदेश दिला जातो. अशा कार्यक्रमांतून युवकांना प्रेरणा मिळून समाजहितासाठी नवे उपक्रम घडतील,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी यावेळी केले.
सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई व जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने महागणेशोत्सवाच्या निमित्ताने जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार निलेश पळसकर, नगरपरिषद मुख्याधिकारी निलेश गायकवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी किशोर बोंडे, मनीष मंत्री आदी मान्यवर उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेनुसार यावर्षीपासून गणेशोत्सवास राज्य उत्सवाचा दर्जा देण्यात आला असून, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांनी प्रास्ताविकातून या उपक्रमाची माहिती उपस्थितांना दिली.त्या म्हणाल्या, गेल्या दहा दिवसांपासून आपण सगळे मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करत आहोत. लोकमान्य टिळकांनी समाजाला एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली, त्यातून निर्माण झालेली ही परंपरा आज महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात, गल्लीबोळात आणि समाजमनात रुजली आहे.
यावर्षीपासून राज्य सरकारने गणेशोत्सवास राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे,या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे भक्ती, संस्कृती आणि सामाजिक संदेश यांचा सुंदर संगम आहे. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून आजच्या महागणेशोत्सवाच्या सांस्कृतिक सोहळ्याला सुरुवात झाली.
*कार्यक्रमात विविध सांस्कृतिक सादरीकरणे रंगली*
नेहरू युवा मंडळाने गोंधळी गीत सादर करून सुरुवात केली.मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहातील मुलींनी गणरायाचे गीत सादर करून वातावरण भारावले. प्रदीप पट्टेबहादूर व संचाने पर्यावरण संवर्धनावर आधारित प्रभावी पथनाट्य सादर केले. महेश राठोड व संच व गजानन कव्हर व संचाने गणेश भक्तीगीते सादर करून उपस्थितांना भक्तिरसात न्हाऊ घातले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. श्याम वानखेडे यांनी केले.भक्तिरस, संस्कृती आणि सामाजिक संदेश यांचा संगम घडवणारा हा कार्यक्रम उपस्थित प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद देत आनंदात अनुभवला.
0 Response to "गणरायाच्या उत्सवातून संस्कृती व सामाजिक बांधिलकी जपुया* *जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर*"
Post a Comment