महसूल विभाग जिल्हा प्रशासनाचा 'कणा' आहे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस
साप्ताहिक सागर आदित्य
महसूल विभाग जिल्हा प्रशासनाचा 'कणा' आहे
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस
महसूल सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ
उत्कृष्ट अधिकारी - कर्मचारी सन्मानित
वाशिम, दि. १ ऑगस्ट प्रत्येक ठिकाणी महसूल विभाग काम करतो. महसूल विभाग हा शासनाचा चेहरा असून, जिल्हा प्रशासनाचा कणा आहे. सामान्य नागरिकांशी थेट जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. महसूल कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेमुळे शासनाच्या योजना गावागावात पोहोचतात. महसूल सप्ताहाच्या माध्यमातून आपल्याला हीच कार्यसंस्कृती अधिक बळकट करायची आहे.
या सप्ताहामध्ये आपण केवळ कार्यक्रमांचे आयोजन करीत नाही, तर नागरिकांचा शासनावरचा विश्वास दृढ करण्याचे कार्य करतो आहोत. योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचावा, शासकीय सेवेचा पारदर्शक आणि वेळेवर पुरवठा व्हावा, हेच या अभियानाचे ध्येय आहे. प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जनतेच्या सेवेसाठी कर्तव्य भावनेने काम करावे, हीच अपेक्षा व्यक्त करते.असे प्रतिपादन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी केले.
आज १ ऑगस्ट रोजी महसूल दिन सप्ताहाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानावरुन श्रीमती बुवनेश्वरी बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी आकाश वर्मा,जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे,मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण , अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील , निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, वाशिमच्या उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, कारंजाचे उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर, उपजिल्हाधिकारी विरेंद्र जाधव, वाशिमचे तहसीलदार निलेश पळसकर,कारंजाचे तहसीलदार कुणाल झाल्टे, मालेगावचे तहसीलदार दीपक पुंडे, रिसोडच्या तहसीलदार प्रतिक्षा तेजनकर,मानोराचे तहसीलदार डॉ.संतोष येवलीकर आदीची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीमती बुवनेश्वरी पुढे म्हणाल्या, महसूल विभागाच्या कामाची तुलना इतर विभागांशी होवू शकत नाही. मोठे कामे करण्याची जबाबदारी महसूल विभाग सातत्याने पार पाडतो. महसूल विभागाकडून विविध कामे केली जातात. काम अधिकाधिक चांगले कसे होईल यासाठी अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी प्रयत्न करावा. वाशिम जिल्हा प्रशासनाने गेल्या काही काळात अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत, त्यामध्ये जलतारा, चिया अभियान आणि पंतप्रधानांच्या दौऱ्याचे नियोजन ही उल्लेखनीय उदाहरणं आहेत. या सगळ्या यशोगाथा केवळ माझ्या किंवा काही अधिकाऱ्यांच्या कामामुळे नाहीत — त्या आपल्या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नांनीच शक्य झाल्या आहेत. मी अभिमानाने सांगू इच्छिते की, वाशिम जिल्हा प्रशासनाची टीम ही अत्यंत उत्तम, सक्षम आणि जबाबदार आहे. प्रत्येक अधिकाऱ्याने, कर्मचाऱ्याने आपले कर्तव्य समजून घेतले आणि दिलेलं काम आत्मीयतेने पार पाडलं. महसूल विभागाने दाखवलेली तत्परता, जिद्द आणि सेवा भाव या प्रत्येक यशामागचं खरे कारण आहेत. विशेषतः पंतप्रधानांच्या दौऱ्याचे अत्यंत सुनियोजित आणि शिस्तबद्ध नियोजन हे केवळ प्रशासनाच्या कार्यक्षमतेचं उदाहरण नव्हे, तर विश्वासार्हतेचं प्रतीक ठरलं आहे.महसूल सप्ताहाच्या निमित्ताने, हे सर्व यश आपण पुन्हा एकदा उजळवूया, जनतेच्या सेवेसाठी अधिक सजग, अधिक पारदर्शक आणि अधिक उत्तरदायी होऊया. माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन! असे गौरवोद्गार जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
सीईओ चव्हाण म्हणाले, महसूल विभाग हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रशासकीय विभाग आहे. नागरिकांच्या मालमत्तेच्या हक्कांपासून ते शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यापर्यंतची जबाबदारी हा विभाग पार पाडत असतो.महसूल विभागाच्या माध्यमातून जमिनीशी संबंधित मोजणी, फेरमोजणी, फेरफार नोंदणी, ७/१२ उतारा, मालमत्तांचे ताबा हस्तांतरण यासारखी कामे केली जातात. दाखल्यांचे वितरण हीदेखील या विभागाची प्राथमिक जबाबदारी आहे. शासकीय जमिनींचे व्यवस्थापन, अतिक्रमणाची तपासणी व कारवाई, तसेच भूसंपादन, नुकसान भरपाई, पुनर्वसन ही कामे महसूल विभाग प्रभावीपणे करीत असतो. यावेळी त्यांनी त्यांचे अनुभव सुद्धा सांगितले.
जिपोअ तारे म्हणाले, महसूल न्यायालयांद्वारे जमिनीविषयक वादांचे निवारण, निवडणूक, जनगणना, स्थानिक प्रशासनाशी संबंधित विविध कामांची पूर्तता, शेतजमिनीचे न्याय निवाडे करतांना पोलिस प्रशासनाला महसूल विभागाची मदत होते.
घुगे म्हणाले, महसूल विभागाशी सर्वांचा संबंध येतो. सर्व समस्यांना न्याय देण्याचे काम महसूल विभाग करतो. आपआपले कौशल्य वापरुन अधिकारी-कर्मचारी न्याय देण्याचे काम करतात. महत्वाचे कार्य करण्याची जबाबदारी महसूल विभागाची आहे. हा विभाग शेवटच्या घटकापर्यत पोहचतो. शासनाच्या अनेक योजना व उपक्रम राबविण्याचे काम महसूल विभाग करीत असतो. सर्वांचा संबंध महसूल विभागाशी येतो. शासनाचा महसूल यंत्रणेवर विश्वास आहे. त्यामुळेच या विभागावर अनेक जबाबदाऱ्या सोपविल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
पाटील म्हणाले, वाशिम जिल्ह्याचं वर्क कल्चर म्हणजे एक आगळंवेगळं उदाहरण आहे. इथले अधिकारी आणि कर्मचारी हे दूरदृष्टिकोन घेऊन कार्य करणारे आहेत. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येकजण आपआपल्या पातळीवर झटतो, हेच वाशिमच्या यशाचं खऱ्या अर्थानं गमक आहे. इथे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ,आपण आपलं काम प्रामाणिकपणे, चोख पार पाडलं, तर त्याची नोंद कुठे न कुठे घेतलीच जाते. हीच आपली खरी प्रेरणा आहे. प्रशासनात काम करताना अडचणी येतातच, पण त्या अडचणींवर मात करत जर आपण नागरिकांचा विश्वास मिळवू शकलो, तर तेच आपल्या कामाचं खऱ्या अर्थानं मोल ठरतं. वाशिम जिल्ह्यात याच भावनेनं काम करणारी टीम आहे. कार्यक्षम, समर्पित आणि कर्तव्यनिष्ठ टीम कार्यरत आहे. या कार्यसंस्कृतीला सलाम करून आपण महसूल सप्ताहाच्या माध्यमातून जनतेशी आपलं नातं अधिक घट्ट करूया. असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी साहेबराव नप्ते ,ज्ञानेश्वर अवधूत ,पुनम इंगोले , विशाल डुकरे, तहसीलदार कुणाल झाल्टे यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यामध्ये कारंजाचे उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, उपविभागीय अधिकारी श्रीमती वैशाली देवकर, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी विरेंद्र जाधव, तहसीलदार संतोष येवलीकर, प्रतिक्षा तेजनकर, नायब तहसीलदार अर्चना घोळवे, सुनील घोडे , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, लघुलेखक वैभव कुलकर्णी, अव्वल कारकून व्ही.एस.पाचपिल्ले, सुजाता भिसे, शरद भाग्यवंत, धनंजय कांबळे, पी.यु. मापारी, एस.व्ही.राईतकर, पी.पी.बायसकर, अनिल बोरसे, महसुल सहाय्यक ज्ञानेश्वर अवधूत, श्रीकांत वडोदे, रोशन सरक, डी.एस. नाकतोडे, जी.एस. गायकवाड , योगेश इंगोले , कैलास कांगटे, देवराव इंगोले, मुंगशीराम ससाने, आर.डी.चांडे, विक्रम पवार, भगवान घुगे यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाला अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन अधीक्षक अर्चना घोळवे, गजानन उगले यांनी केले.उपस्थितांचे आभार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी केले.
0 Response to "महसूल विभाग जिल्हा प्रशासनाचा 'कणा' आहे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस"
Post a Comment