-->

शेतकऱ्यांच्या हितासाठी  जिल्ह्यात 'तक्रार निवारण दिन' उपक्रम यशस्वी

शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्ह्यात 'तक्रार निवारण दिन' उपक्रम यशस्वी



साप्ताहिक सागर आदित्य 

 शेतकऱ्यांच्या हितासाठी  जिल्ह्यात 'तक्रार निवारण दिन' उपक्रम यशस्वी 


दर सोमवारी होत असलेल्या बैठकीत शेतरस्त्यांचे वाद जलदगतीने सोडवले जात आहेत


वाशिम, दि. २३ जुलै : वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसंबंधी अडचणींवर त्वरित तोडगा मिळावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या संयुक्त पुढाकाराने 'तक्रार निवारण दिन' हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. दर सोमवारी दुपारी १२ ते १ या वेळेत तहसील कार्यालयात होणाऱ्या संयुक्त बैठकीत शेतरस्त्यांचे व शेतीशी संबंधित वाद जलदगतीने निकाली काढले जात असून, या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


सध्या जिल्ह्यात खरीप हंगामासाठी मशागत व पेरणीची कामे वेगात सुरू असून, या काळात शेतकरी पारंपरिक शेतरस्त्यांचा वापर करतात. मात्र अनेक ठिकाणी हे रस्ते अडवल्यामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होत होती. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ चे कलम १४३ व मामलेदार कोर्ट अ‍ॅक्ट, १९०६ चे कलम ५ नुसार आदेश होऊनही काही प्रकरणे प्रलंबित होती. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होत होता.


ही स्थिती लक्षात घेता जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार, प्रत्येक तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, भूमी अभिलेख अधिकारी व पोलीस निरीक्षक यांच्या संयुक्त उपस्थितीत बैठका घेण्याचा निर्णय झाला. या बैठकीत प्रतिनिधी पाठवण्यास मज्जाव असून संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष हजर राहणे अनिवार्य करण्यात आले आहे.


या बैठकीत शेतकऱ्यांकडून लेखी स्वरूपात तक्रारी स्वीकारून त्यांची तात्काळ नोंद घेतली जाते आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या समन्वयातून त्यांचे निराकरण केले जाते. त्यामुळे संभाव्य वाद टाळून शेतकऱ्यांना पारंपरिक रस्त्यांनी शेतीकामे व मालाची वाहतूक करण्यास सुलभता मिळत आहे.


आजवर एकूण सहा अशा बैठका पार पडल्या असून, प्रत्येक तहसीलसाठी एक ठराविक दिवस निश्चित करण्यात आला आहे. वाशिम तहसीलमध्ये दर सोमवारी 'तक्रार निवारण दिन' साजरा केला जातो. प्रत्येक सभेसाठी स्वतंत्र नोंदवही ठेवली जाते, ज्यावर अधिकारी व तक्रारदार यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातात. प्राप्त व निकाली निघालेल्या तक्रारींचा अहवाल प्रत्येक सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयात सादर केला जातो.


जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक हे स्वतः या उपक्रमाचा दर पंधरवड्याला आढावा घेत असून, तहसीलदार व ठाणेदार यांना जनजागृती करून जास्तीत जास्त प्रकरणे या बैठकीत निकाली काढावीत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी तक्रारींचा डेटा संकलन व सादरीकरणासाठी नमुना देखील प्रदान करण्यात आला आहे.


शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हा प्रशासन सजग या उपक्रमामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत झाली असून, शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. पारंपरिक रस्ते मोकळे करून दिल्यामुळे शेतीकामे वेळेत पार पडत आहेत. जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा यांच्या संयुक्त प्रयत्नामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सुटत असून, हा उपक्रम भविष्यातही सातत्याने सुरू ठेवण्यात येणार आहे.  तालुकास्तरीय तक्रार निवारण दिन: नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी व अडीअडचणींवर  मात करण्यासाठी दर मंगळवारी वाशिम तहसील, बुधवारी रिसोड व मालेगाव, गुरूवारी मानोरा व मंगरूळपीर, शुक्रवारी कारंजा येथे तक्रार निवारण दिन घेण्यात येतो. तरी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी केले आहे.

0 Response to "शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्ह्यात 'तक्रार निवारण दिन' उपक्रम यशस्वी "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article