
अपघातप्रवण रस्त्यांवर उपाययोजना राबवा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस
साप्ताहिक सागर आदित्य
अपघातप्रवण रस्त्यांवर उपाययोजना राबवा
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस
रस्ता सुरक्षा मोहिमेअंतर्गत बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
वाशिम, (जिमाका) जिल्ह्यातील अपघातांची वाढती संख्या ही केवळ आकडेवारी नसून, अनेक कुटुंबांसाठी ती कायमची जखम आहे. रस्ते अपघातांमुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासन आता अधिक सक्रिय झाले असून, अपघातप्रवण ठिकाणांवर उपाययोजना राबविण्याचे ठोस पावले उचलली जात आहेत.
जिल्ह्यात अपघात होऊ नये यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा मोहिमेअंतर्गत महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या.यामध्ये अपघातप्रवण ठिकाणांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी यंत्रणांना दिले.
जिल्हाधिकारी पुढे बोलतांना म्हणाल्या, तालुका निहाय तसेच रस्ते निहाय सर्वेक्षण करून अपघात होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांची ओळख करावी, तसेच रस्त्यांवरील सुरक्षितता वाढविण्यासाठी स्पीड ब्रेकर, रेडियम पट्ट्या, साईन बोर्ड, रिफ्लेक्टर आणि सिग्नल यंत्रणा उभारण्याचे काम तातडीने हाती घ्यावे.
या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, कार्यकारी अभियंता शुभम जोशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संग्राम कुमार जगताप, जिल्हा वाहतूक निरीक्षक संतोष शेळके, मुख्याधिकारी निलेश गायकवाड, नियोजन अधिकारी संजय राठोड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत आणि उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) गजानन डाबेराव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
वाहतूक पोलिसांच्या कारवाईमुळे अपघातात घट
वाहतूक पोलिसांनी गेल्या तीन महिन्यांत केलेल्या कडक कारवाईमुळे अपघातांचे प्रमाण घटले आहे. ड्रंक अँड ड्राईव्हचे ७७, १८ वर्षांखालील वाहनचालकांचे २६३, विना हेल्मेट १९०५, ट्रिपल सीट ६७४४, इतर ७९५३ केसेसवर कारवाई करण्यात आली असून यामुळे जिल्हाधिकारी यांनी वाहतूक शाखेच्या कार्याचे कौतुक केले.
अपघातप्रवण ठिकाणी उपाययोजना
कारंजा शहरातील शेलुबाजार, रिलायन्स पेट्रोल पंप समोरील रस्ता, वाशिमकडून आणि अमरावतीकडून येणारे रस्ते तसेच प्रकाश दादा डहाके पर्यटनस्थळाकडे जाणारा मुर्तीजापूरकडील रस्ता या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवणे, रेडियम पट्ट्या व रेडियम बोर्ड लावणे आवश्यक आहे. सावरकर चौक, कारंजा येथे चारही बाजूंनी रंमलर बसवावेत. अनसिंग फाटा, SH-51 वर रंमलर लावून साईन फलक उभारावेत. सोहळ फाटा, कारंजा येथे वळण असल्यामुळे रंमलर बसवावेत. मंगळसा फाटा, मंगरुळपीर येथे रंमलर व साईन फलक लावावेत. बिटोडा (तेली) व पार्डी टकमोर, वाशिम ग्रामीण येथून हायवेवरून गावात जाणाऱ्या रस्त्यांवर स्पीड ब्रेकर बसवावेत. हराळ फाटा, रिसोड येथे ब्रेकर व रिफ्लेक्टर लावावेत. मुंगसाजी रोड, रिसोड येथे टर्निंग पॉइंट व शाळा असल्यामुळे रंमलर लावावेत. इलखी रोड, अनसिंग येथे देखील ब्रेकरची आवश्यकता आहे. याचबरोबर वाहतूक शाखेकडून हॅप्पी फेसेस शाळेमध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यांना मोटर वाहन कायद्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
आरजे कन्सल्टन्सीचा अभ्यास सादरीकरण
पुणे येथील आर जे कन्सल्टन्सी या संस्थेने वाशिम व रिसोड तालुक्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गांचे सर्वेक्षण करून अपघातप्रवण ठिकाणी कोणत्या उपाययोजना कराव्यात याचे ऑनलाइन सादरीकरण केले.
0 Response to "अपघातप्रवण रस्त्यांवर उपाययोजना राबवा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस "
Post a Comment