-->

जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर नेणारा एक दीपस्तंभ : जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस

जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर नेणारा एक दीपस्तंभ : जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस



साप्ताहिक सागर आदित्य 

जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर नेणारा एक दीपस्तंभ : जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस


वाशिममधील दोन वर्ष : प्रेरणादायी कार्य प्रवासाच्या तेजस्वी पाऊलखुणा आणि  संवेदनशीलतेची शिदोरी


जेव्हा एखादी प्रशासकीय अधिकारी आपल्या जिल्ह्याला केवळ कार्यालयीन दृष्टिकोनातून पाहत नाही, तर तिचं हृदय त्या भूमीशी जुळतं...तेव्हा निर्णय फक्त फाईलपुरते राहत नाहीत, ते जनतेच्या आयुष्याला उजाळा देतात. वाशिमच्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी दोन वर्षांत असाच परिवर्तनाचा ध्यास घेतला आणि आज त्यांचा कार्यकाळाचा दोन वर्षांचा टप्पा तेजस्वीपणे पूर्ण झाला आहे.

२४ जुलै २०२३ रोजी कार्यभार स्वीकारल्यापासून त्यांनी वाशिमच्या प्रशासकीय व सामाजिक नकाशावर अनेक ठळक नोंदी उमटवल्या.

यातील एक महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणजे ‘जलतारा योजना’ जलसंधारण क्षेत्रातील क्रांतिकारी पुढाकार. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जलतारा योजनेअंतर्गत जलव्यवस्थापनाच्या अहोरात्र अगदी ग्राउंड लेवलवर जाऊन त्यांनी प्रत्यक्ष काम केले. जलतारामुळे अगदी सामान्य माणूस आज त्यांना  जलतारा क्वीन संबोधत आहे. दुष्काळग्रस्त वाशिम जिल्ह्यात आज पाण्याचा खळखळाट दिसत आहे. विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आणि शेतकऱ्यांना खरिपासह रब्बी हंगामातही नवजीवन मिळालं. त्यांच्या पुढाकाराने वत्सगुल्म भूजल पुनर्भरण स्पर्धा २०२५.

ही स्पर्धा एक चळवळ ठरली — श्रमदानातून साकारलेली, लोकसहभागातून उभी राहिलेली आणि पर्यावरणप्रेमातून वाढलेली.

गावकऱ्यांनी हातात फावडे घेतले आणि जमिनीला दिला नवजीवनाचा श्वास.

तिथं केवळ जलतारे तयार झाले नाहीत, तर निर्माण झाली उमेद, एकजूट आणि जलजागरूकतेची नवी ओळख. यामुळेच ४० दिवसांत ४० हजार जलतारे निर्मितीची दखल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडनने घेतली.


त्याचबरोबर, जिल्ह्यात आरोग्यवर्धक आणि पोषणदृष्ट्या लाभदायक अशा 'चिया सिड्स'च्या लागवडीला त्यांनी प्रोत्साहन दिलं. हे सुपरफूड वाशिमसारख्या कोरडवाहू भागात सहज उत्पादित होऊ शकते, याची जाणीव ठेवून कृषी विभागासोबत समन्वय साधत त्यांनी प्रयोगशील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं.जिल्ह्यात कृषी नवसंवर्धन घडवून आणलं. यातूनच उभा राहिला ‘वाशिम शेती शिल्प’  एक स्थानिक ब्रँड, ज्याने जिल्ह्यातील शेतमालाला नवी ओळख आणि बाजारपेठ दिली.चिया सिड्स हे कमी पाण्यात येणारे, परंतु पोषणमूल्यांनी भरलेले पीक – याचा अभ्यास करून त्यांनी कृषी विभागाशी समन्वय साधत शेतकऱ्यांना याची लागवड करण्यास प्रवृत्त केलं. शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे, बीज उपलब्धता, विक्री संधी, प्रक्रिया केंद्रे यामध्ये त्यांनी विशेष लक्ष घातले.

आज वाशिम जिल्ह्याचे चिया सिड्स 

एका नवख्या पिकामुळे संधीचा नवा मार्ग खुला झाला आणि जगाच्या बाजारपेठेत वाशिमचा ‘स्वाद’ पोहोचला.

‘वाशिम शेती शिल्प’ या जिल्हा ब्रँडखाली या उत्पादनाला एक सुसंगत ओळख मिळत आहे. या उपक्रमामुळे केवळ उत्पन्न वाढले नाही, तर शेतकऱ्यांना आत्मसन्मान, आणि जिल्ह्याला अभिमान मिळाला.


पोहरादेवीच्या बाबतीत शासनाने मान्य केलेल्या विकास आराखड्याला प्रत्यक्षात आणण्यासाठी व मूर्त स्वरूप देण्यासाठी विशेष भूमिका बुवनेश्वरी एस. यांनी यांनी बजावली.

आराखड्याअंतर्गत बणजारा विरासत,मंदिर परिसर, रस्ते, वाहतूक नियोजन, पायाभूत सुविधा, महिला सुविधा, शौचालये, पर्यटक निवास यासाठी शासन आणि प्रशासनाचा योग्य समन्वय जिल्हाधिकाऱ्यांनी ठेवला.


लोकसभा व विधानसभा निवडणुकांतील नेतृत्व

लोकशाहीचे सर्वात मोठे सण – लोकसभा व विधानसभा निवडणुका या काळात जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अत्यंत नेटके, पारदर्शक आणि काटेकोर नियोजन केले.

मतदान प्रक्रियेपासून, आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी, सुरक्षा, प्रशिक्षण, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट व्यवस्थापन – सर्वच टप्प्यांवर त्यांनी दक्षता घेतली. महिला व दिव्यांग मतदारांसाठी सुविधायुक्त मतदान केंद्रांची निर्मिती, मतदार जनजागृतीसाठी नवोन्मेषी उपक्रम, व युवकांमध्ये मतदानाबाबतची रुची वाढवण्यासाठी सायकल रॅली, रन फॉर डेमोक्रसी यशस्वीपणे पार पडल्या.


पंतप्रधानांचा पोहरादेवी दौरा — व्यवस्थापनाची कौशल्यपूर्ण साक्ष


६ ऑक्टोबर २०२४ चा दिवस वाशिम जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा ! संत श्री सेवालाल महाराज,जगदंबा देवी मातेचे स्थान असलेल्या पोहरादेवी नगरीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्यक्ष आले, हे वाशिमच्या अस्मितेचे प्रतीक ठरले.

या दौऱ्याच्या यशस्वीतेमागे होत्या.जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांचे प्रामाणिक, काटेकोर आणि अचूक नियोजन. त्यांनी सुरक्षा यंत्रणा, वाहतूक नियोजन, नागरी व्यवस्था, आरोग्य सुविधा, आपत्कालीन व्यवस्थापन आणि कार्यक्रम व्यवस्थापनाचे सर्व घटक आपसांत समन्वयाने जोडले. दौऱ्याच्या प्रत्येक क्षणाचे सूक्ष्म नियोजन, शिस्तबद्धता आणि संयोजन ही त्यांच्या नेतृत्वातील प्रशासनाची ओळख बनली.


या दौऱ्यात पोहरादेवीसाठी प्रस्तावित विकास आराखड्यालाही नवसंजीवनी मिळाली. पंतप्रधानांनी संतांच्या कार्याबाबत भावनिक भाष्य करताना या स्थळाच्या आध्यात्मिक महत्त्वाला जागतिक व्यासपीठ दिलं आणि यामागे प्रशासनाच्या नियोजनशक्तीचा मोठा वाटा होता.


संकटाची छाया जिथे गडद झाली, तिथे प्रशासन एक आधारवड बनून उभं राहिलं…जिल्ह्यातील गेल्या दोन वर्षांतील अनेक संकटांच्या क्षणी, बुवनेश्वरी एस यांचं नेतृत्व हे धैर्य, दूरदृष्टी आणि मानवी संवेदनांचा उत्तम संगम ठरलं. अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य परिस्थिती उद्भवली, काही भागांत शेतकऱ्यांचे जीवित आणि मालमत्ता संकटात सापडले. अशा वेळी "प्रशासन जनतेसाठी आहे" हे केवळ वाक्य उरलं नाही, तर कृतीतून सिद्ध झालं.


गावोगावी मदत कार्य तत्परतेने राबविण्यात आलं. बचाव पथकांपासून ते वैद्यकीय मदत, तात्पुरती निवास व्यवस्था, अन्नधान्य वितरणापर्यंत सगळ्या उपाययोजना चोखपणे अमलात आणण्यात आल्या. केवळ अहवाल घेऊन परत न जाता, जिल्हाधिकारी स्वतः घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतात. अशा प्रसंगी प्रशासन जनतेच्या हाकेला किती तत्पर असू शकतं, याचा आदर्श वाशिमने पाहिला.


जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांच्या अडचणी

ऐकण्यासाठी नवे डिजिटल व्यासपीठ सुरू झाले. 

शेतकरी बांधवांसाठी एक दिलासादायक पाऊल

असून  बँकेमध्ये संबंधित अडचणी, समस्या किंवा अन्य

तक्रारी थेट नोंदवता येणार आहेत. जिल्हा अग्रणी

विभागाने यासाठी विशेष ऑनलाइन तक्रार नोंदणी प्रणाली कार्यान्वित केली आहे.

बालकांच्या संरक्षणासाठी, अपघातप्रवण रस्त्यांवरील उपाययोजना, महिला सक्षमीकरण, जलसंधारण आणि कृषी विकास या क्षेत्रांत त्यांनी राबवलेले उपक्रम उल्लेखनीय ठरले. नागरिकांच्या अडचणींना संवेदनशीलतेने समजून घेणं आणि त्यावर त्वरित उपाय करणं ही त्यांची खासियत.


वाशिमच्या अनेक ग्रामपंचायती, शाळा, शेतकरी गट आणि महिला बचत गटांसोबत थेट संवाद साधणाऱ्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांची लोकांशी असलेली नाळ अधिक घट्ट झाली. त्यांच्या निर्णयात कृती होती, आणि कृतीत होता ‘सामाजिक भान’.


त्यांच्या अभिनव विचारांना राजीव गांधी गतिमानता पुरस्कार आणि राज्यस्तरीय बालस्नेही पुरस्कार यासारखे गौरव मिळाले. हे पुरस्कार केवळ त्यांची प्रशासकीय यशोगाथा सांगत नाहीत, तर त्यांच्या नेतृत्वातील 'माणुसकीचा व संवेदनशीलता' दाखवतात.


प्रशासन म्हणजे केवळ आदेश देणारी संस्था नसून ती दिशा देणारी प्रेरणा असते हे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी सिद्ध केलं.त्यांचा हा प्रवास आजही वाशिमच्या मातीत स्फूर्तीचा झरा बनून वाहतो आहे.आज वाशिम जिल्ह्याने त्यांच्या नेतृत्त्वाचा दोन वर्षांचा सोनेरी टप्पा पार केला आहे, त्यांच्या कार्याची प्रेरणा ही पुढच्या अनेक वर्षांची वाट उजळवणारी आहे. एका प्रशासकीय अधिकाऱ्याचं जनतेशी जडलेलं नातं, वाशिमच्या हृदयात कायमस्वरूपी अंकित झालं आहे .एका दीपस्तंभाप्रमाणे, जो न थकता प्रकाश देत राहतो...


संकलन : 

जिल्हा माहिती कार्यालय,

वाशिम

0 Response to "जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर नेणारा एक दीपस्तंभ : जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article