
दुर्धर आजाराने ग्रस्तांनी बाल संगोपन योजनेचा लाभ घ्यावा – डॉ. माया वाठोरे यांचे आवाहन
साप्ताहिक सागर आदित्य
📰 दुर्धर आजाराने ग्रस्तांनी बाल संगोपन योजनेचा लाभ घ्यावा – डॉ. माया वाठोरे यांचे आवाहन
वाशिम (प्रतिनिधी) – समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील दुर्धर आजाराने ग्रस्त पालकांनी आपल्या लहानग्यांचे भवितव्य सुरक्षित राहावे यासाठी शासनाने सुरु केलेल्या बाल संगोपन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आर्यव्रत पॅरामेडिकल कॉलेजच्या संचालिका तथा समाजसेविका डॉ. माया रमेश वाठोरे यांनी केले आहे.
डॉ. वाठोरे म्हणाल्या की, कर्करोग, एड्स, किडनी निकामी होणे यासारख्या गंभीर आजारांमुळे अनेक कुटुंबांची आर्थिक स्थिती ढासळते आणि त्याचा परिणाम निरागस बालकांच्या शिक्षणावर व संगोपनावर होतो. या परिस्थितीत शासनाने राबविलेल्या बाल संगोपन योजनेत दरमहा आर्थिक मदतीचे नियोजन करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना शिक्षण व पोषणासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
त्यांनी पुढे सांगितले की, या योजनेसाठी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयात अर्ज करता येतो. लाभ घेण्यासाठी संबंधित कागदपत्रे – आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, आजाराचे वैद्यकीय प्रमाणपत्र, बालकाचा जन्म दाखला आदी आवश्यक आहेत.
डॉ. माया वाठोरे यांनी पालकांना आवाहन केले की, “आजारपणाशी झुंज देतानाच आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. ही योजना गरजू पालकांसाठी मोठा आधार ठरेल.”
तसेच, माहिती व मार्गदर्शनासाठी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, वाशिम येथे संपर्क साधावा, असेही त्यांनी कळविले आहे.
0 Response to "दुर्धर आजाराने ग्रस्तांनी बाल संगोपन योजनेचा लाभ घ्यावा – डॉ. माया वाठोरे यांचे आवाहन"
Post a Comment