
आरोग्य योजनांचा आढावा; डॉक्टरांनी सजगतेने जबाबदारी पार पाडावी
साप्ताहिक सागर आदित्य
प्रत्येक रुग्णाला वेळेवर उपचार हिच प्रशासनाची कटिबद्धता
आरोग्य योजनांचा आढावा; डॉक्टरांनी सजगतेने जबाबदारी पार पाडावी
अप्पर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील
वाशिम
जिल्ह्यातील नागरिकांना वेळेवर आणि प्रभावी आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी शासनाच्या विविध आरोग्य योजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात यावी. डॉक्टरांनी रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी सजग राहावे, कोणतीही ढिलाई न करता तत्परतेने उपचार द्यावेत. असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील यांनी केले.
जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक परिणामकारक बनवण्यासाठी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनांचा संयुक्त आढावा बैठक अप्पर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात १४ जुलै रोजी संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.
पाटील म्हणाले ,शासकीय व खाजगी रुग्णालयातील सर्व डॉक्टरांनी रुग्णांचा जीव वाचविणे, वेळेवर उपचार देणे, हे आपले प्रथम कर्तव्य समजून कार्य करावे. कोणत्याही कारणाने उपचारास विलंब होणार नाही, याची खबरदारी घेतली जावी.
यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अविनाश पुरी , जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी स्वप्नील चव्हाण, भारतीय वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ.संतोष सारडा, जिल्हा समन्वयक डॉ.रणजित सरनाईक, जिल्हा प्रमुख वैभव टकले व अंगीकृत रुग्णालयांचे वैद्यकीय समन्वयक यांची प्रमुख उपस्थिती होती.
केंद्र शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना जिल्ह्यात १ एप्रिल २०२० तसेच २८ जुलै २०२३ पासून सर्व शिधापत्रिका धारक कुटुंबाचा समावेश करण्यात आला आहे.या योजनेत जिल्ह्यात ११ लक्ष ५३ हजार ९५७ लाभार्थ्यांचा आतापर्यंत पात्र झाले आहेत आहे.
या योजनेमध्ये १ हजार ३५६ गंभीर आजारांवर ५ लक्ष रुपयापर्यंतच्या शस्त्रक्रिया व उपचार अंगीकृत शासकीय आणि खासगी रुग्णालयातून पूर्णतः मोफत केले जातात.हे आरोग्य विमा कवच प्रति कुटुंब,प्रति वर्ष ५ लक्ष रुपये अशा स्वरूपात मिळत असते.
जिल्ह्यात ९ शासकीय व खाजगी २० रुग्णालये अंगीकृत आहेत. जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, वाशिम,उपजिल्हा कारंजा, ग्रामीण रुग्णालय मानोरा, ग्रामीण रुग्णालय मंगरूळपीर, ग्रामीण रुग्णालय मालेगाव, ग्रामीण रुग्णालय अनसिंग, ग्रामीण रुग्णालय कामरगाव,ग्रामीण रुग्णालय रिसोड, जिल्हा स्त्री रुग्णालय वाशिम,बालाजी बाल रुग्णालय वाशिम,बिबेकर हॉस्पिटल वाशिम ,हॉस्पिटल,कानडे बाल रुग्णालय वाशिम,लाईफ लाईन हॉस्पिटल,प्रताप हॉस्पिटल वाशिम , जिजाऊ ऑर्थोकेअर वाशिम,
बाहेती हॉस्पिटल वाशिम,वोरा हॉस्पिटल वाशिम,वाशिम क्रिटिकल केअर सेन्टर वाशिम,गजानन बाल रुग्णालय हॉस्पिटल वाशिम,श्री. गजानन बाल रुग्णालय मालेगांव, खंडेश्वर हॉस्पिटल धानोरा, गाभणे हॉस्पिटल वाशिम,गजानन हॉस्पिटल रिसोड,विजय हृदयालय वाशिम , साई हॉस्पिटल वाशिम,देशमुख बाल रुग्णालय वाशिम, डाळ हॉस्पिटल वाशिम , काकडे हॉस्पिटल वाशिम रुग्णालयाचा समावेश आहे. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या रुग्णालयांचे पाटील यांनी यावेळी अभिनंदन केले.
आजपर्यंत या योजनेमधून १४ हजार १४५ लाभार्थ्यांना उपचार आणि शस्त्रक्रियाचा लाभ मिळाला असून यावर ६४ कोटी ५९ लक्ष ९६ हजार ७७० रुपये खर्च शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे.
या बैठकीत योजनांची अंमलबजावणी, लाभार्थ्यांची सद्यस्थिती, रूग्णालयांची कार्यक्षमता व सेवा गुणवत्ता यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या वेळी योजनांची माहिती व प्रगतीचे सादरीकरण जिल्हा समन्वयक डॉ. रणजित सरनाईक यांनी प्रभावीपणे केले.
तसेच बैठकीत आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य अंतर्गत रास्त भाव दुकानदार, सेतू सुविधा केंद्र आणि आशा सेविका यांचेमार्फत पात्र लाभार्थींना आयुष्मान कार्डचे वितरण केले जात आहे. याबाबत चर्चा करण्यात आली.
आतापर्यंत ५ लक्ष १६ हजार ७७७ लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड चे वितरण करण्यात आलेले आहे.
आयुष्मान भारत योजनेचे आयुष्यमान कार्ड सर्वांना जुलै २०२५ अखेर शंभर टक्के वितरण करावे असे निर्देश देण्यात आले. प्रलंबित विषयांवर विभागनिहाय सविस्तर चर्चा झाली. याबाबत प्रलंबित प्रकरणांचे तातडीने निराकरण करून लाभार्थ्यांना योग्य तो लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना दिल्या.
आरोग्य सेवा ही सामान्य जनतेच्या जीवनाशी निगडीत बाब आहे. यामध्ये कोणतीही दिरंगाई न करता जबाबदारीने कार्य करणे आवश्यक आहे, असे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.
0 Response to "आरोग्य योजनांचा आढावा; डॉक्टरांनी सजगतेने जबाबदारी पार पाडावी "
Post a Comment