
वाशिम जिल्ह्याच्या विकासाला गती देणार पालकमंत्री दत्तात्रय भरणे 'आकांक्षित' ही ओळख पुसण्याचा व्यक्त केला निर्धार
साप्ताहिक सागर आदित्य
वाशिम जिल्ह्याच्या विकासाला गती देणार
पालकमंत्री दत्तात्रय भरणे
'आकांक्षित' ही ओळख पुसण्याचा व्यक्त केला निर्धार
वाशिम, जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री तथा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास तसेच औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दि.२८ मार्च रोजी जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेतला.
बैठकीला जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका असलेल्या अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. आमदार भावना गवळी, बाबूसिंग महाराज, श्याम खोडे, किरणराव सरनाईक, सई डाहाके यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी—जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, उपवनसंरक्षक अभिजित वायकोस, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे उपस्थित होते.
त्यांनी आगामी गुढीपाडवा आणि रमजान ईदच्या सर्व जिल्हावासियांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. दरम्यान जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पॉम्पलेट पत्राचे विमोचन उपस्थित मान्यवरांनी केले.वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करत ते म्हणाले की, पालक म्हणून या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यावर आपला विशेष भर असेल. जिल्हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला असल्याचे नमूद करत श्री. भरणे यांनी या भागाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. नीती आयोगाने वाशिमला आकांक्षित जिल्हा म्हणून घोषित केले असून, ही ओळख पुसून टाकण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला. सर्व समाज बांधवांना कोणत्याही प्रकारचा पक्षपात न करता समान न्याय मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
जिल्ह्यात शांतता, बंधुभाव, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा प्रशासनाला सूचना देण्यात आल्या असून, कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यातील रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्री म्हणून विशेष प्रयत्न करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. वाशिम जिल्ह्याला लाभलेला ऐतिहासिक वारसा लक्षात घेऊन विकासाला गती देण्याचेही त्यांनी आश्वासन दिले. महायुती सरकारचा घटक म्हणून सर्वांना समान वागणूक आणि सन्मान मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
विशेषतः जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सिंचनाच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.यावेळी पालकमंत्री भरणे यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदन केले. जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांना शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे राज्यस्तरीय प्रगती पुरस्कारात प्रथम क्रमांक मिळाला. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांना राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सर्वोत्कृष्ट कल्पना व उपक्रम यात प्रथम क्रमांक, आणि जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पाचव्यांदा राज्यात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.
जिल्ह्यात अनेक विकासकामांची गरज असल्याचे मान्य करत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी विशेष लक्ष देण्याचे ठरवले आहे. त्यांच्या या भेटीमुळे जिल्ह्यातील विकासाला नवीन दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
पत्रकारांसमवेत संवाद:
यावेळी पालकमंत्री भरणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या समस्यांविषयी चर्चा केली. तसेच गुढीपाडवा व रमजान सणाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी पत्रकार बांधव उपस्थित होते.
0 Response to "वाशिम जिल्ह्याच्या विकासाला गती देणार पालकमंत्री दत्तात्रय भरणे 'आकांक्षित' ही ओळख पुसण्याचा व्यक्त केला निर्धार "
Post a Comment