
मालेगाव येथील रोजगार मेळाव्यात २० युवक-युवतींची प्राथमिक निवड
साप्ताहिक सागर आदित्य
मालेगाव येथील रोजगार मेळाव्यात २० युवक-युवतींची प्राथमिक निवड
वाशिम , महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम यांच्या वतीने नाना मुंदडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मालेगाव (जि. वाशिम) येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या मेळाव्याद्वारे जिल्ह्यातील तरुणांना विविध क्षेत्रातील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पुढाकार घेण्यात आला. राज्यातील नामांकित उद्योग-व्यवसायांकडून ५६ हून अधिक रिक्त पदांसाठी मनुष्यबळाची मागणी करण्यात आली होती.
उत्स्फूर्त प्रतिसाद – २० युवक-युवतींची प्राथमिक निवड
रोजगार मेळाव्यास एकूण २३० उमेदवारांनी सहभाग नोंदवला. यामध्ये राज्यातील नामांकित ५ उद्योग व व्यावसायिक प्रतिनिधींनी थेट मुलाखती घेतल्या. मुलाखतीनंतर २० नोकरी इच्छुक उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन :
या रोजगार मेळाव्यास नाना मुंदडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मालेगावचे प्राचार्य दिनेशकुमार उंटवाल आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम चे सहायक आयुक्त प्रविण खंडारे यांनी उपस्थित राहून उमेदवारांना मार्गदर्शन केले.
उद्योजकांसाठी आणि नोकरी इच्छुकांसाठी सुवर्णसंधी :
अशा प्रकारच्या रोजगार मेळाव्यांमुळे तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतात आणि उद्योग क्षेत्रालाही प्रशिक्षित मनुष्यबळ मिळते. भविष्यात अशा रोजगार मेळाव्यांचे आयोजन अधिक मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार असल्याचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम यांनी कळविले आहे.
यशस्वी आयोजनासाठी सहकार्य:
रोजगार मेळावा यशस्वी पार पाडण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम यांच्या वतीने दीपक भोळसे, संजय उगले, प्रदीप नेमाडे, मनीष पवार व अमोल मरेवाड यांनी पुढाकार घेतला.
0 Response to "मालेगाव येथील रोजगार मेळाव्यात २० युवक-युवतींची प्राथमिक निवड"
Post a Comment