
जिल्ह्यात 63 हजारावर घरकुलांना मंजुरी. महा आवास योजना प्रभावी व पारदर्शक राबवा: सीईओ वाघमारे
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्ह्यात 63 हजारावर घरकुलांना मंजुरी.
महा आवास योजना प्रभावी व पारदर्शक राबवा: सीईओ वाघमारे
वाशिम
जिल्ह्यात महा आवास योजना अत्यंत प्रभावी व पारदर्शकपणे राबविण्यात येत असुन याअंतर्गत जिल्ह्यात 63 हजारावर घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत यापैकी 10 एप्रिल 2025 पर्यंत 6 हजार दोनशे घरकुलांची कामे ही अत्यंत पारदर्शक व प्रभावीपणे पुर्ण करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी दिले आहेत.
प्रधानमंत्री आवास योजनेचे 44 हजार सहाशे एकोणसाठ आणि रमाई आवासचे 19 हजार 56 असे एकुण 63 हजार सातशे पंधरा घरकुलांना या वर्षीच्या कृती आराखड्यात मंजुरी देण्यात आली आहे. तसेच याशिवाय इतरही योजनांमधुन घरकुलांचा लाभ देण्यात येणार आहे. विशेष: बौध्द व अनुसुचित जाती समुहांच्या लाभार्थ्यांकरीता राबविण्यात येणाऱ्या रमाई आवास योजनेसाठी तब्बल 19 हजार 56 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे.
स्वत:चे पक्के घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. घरकुलाच्या माध्यमातुन हजारो ग्रामिण कुटुंबाचे हे स्वप्न पुर्ण होत आहे. यासाठी जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा या विभागाची टीम पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. या विभागाशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतुन काम केल्यास या गामाला गती येईल आणि ग्रामिण भागातील लोकांचे घरकुलाचे स्वप्नही साकार होईल. त्यामुळे घरकुलाचा लाभ देतांना एकाही लाभार्थ्यास त्रास होणार नाही आणि त्यांना वेळेत हप्ते मिळतील याची खबरदारी घेण्याच्या सुचना सीईओ वाघमारे यांनी या विभागाशी संबंधित यंत्रणेला दिल्या.
"सर्वांसाठी घरे" या शासनाच्या धोरणांतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना, मोदी आवास घरकुल योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी महाराष्ट्र राज्यात दिनांक ०१ जानेवारी, २०२५ ते दिनांक १० एप्रिल, २०२५ या १०० दिवसांच्या कालावधीत "महा आवास अभियान २०२४-२५" राबविण्यात येत आहे.
--------------------------------------------
"महा आवास अभियान २०२४-२५" राबविण्याचे उद्देश:
राज्यात ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे हे या महा आवास अभियान 2024-25 चे उद्दिष्ट आहे. ग्रामीण गृहनिर्माण योजनांमध्ये शासकीय यंत्रणा व पंचायतराज संस्था यांचेबरोबरच समाजातील सर्व घटक जसे स्वयंसेवी संस्था (लायन्स क्लब, रोटरी क्लब, इ.), सहकारी संस्था (साखर कारखाने, दुधसंघ, इ.), खासगी संस्था, तंत्र शिक्षण संस्था, बँका, लोकप्रतिनिधी, लाभार्थी, ग्रामस्थ, इ. भागधारकांचा सक्रिय सहभाग वाढविणे हे या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. तसेच राज्यात ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रातील भागधारकांची क्षमताबांधणी व जन-जागृतीद्वारे लोक चळवळ उभी करणे, ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ देणे. आणि ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रामध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून घरांचा दर्जा व गुणवत्ता वाढविणे हेही या अभियानाचे उद्दिष्ट आहे.
------------------------------------------------
पुढील दोन महिन्यात जिल्ह्यात तब्बल 6 हजार दोनशे घरकुले बांधण्यात येणार आहे. यामध्ये मालेगाव तालुक्यामध्ये 1200 आणि उर्वरित 5 तालुक्यांना प्रत्येकी एकेक हजाराचे उद्दिष्टे देण्यात आले आहे. येणाऱ्या 10 एप्रिल 2025 पर्यंत हे उद्दिष्ट्ये पुर्ण करण्यात येणार आहे. -किरण गणेश कोवे, प्रकल्प संचालक, डीआरडीए
----------------------------------------------
पैसे मागितले जात असल्यास तात्काळ पुराव्यासह तक्रार करा: सीईओ वाघमारे
जिल्ह्यामध्ये, प्रधानमंत्री आवास, रमाई, शबरी, मोदी आवास अंतर्गत घरकुलांचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. घरकुले मंजूर करण्यास अथवा हप्ते वितरण करण्यास विलंब होत असल्यास सुद्धा संबंधित नागरिकांनी जिल्हा परिषदेकडे पुराव्यांसह तक्रार करावी. घरकुले मंजूर करताना व घरकुलाचे विविध हप्ते मंजूर करतांना कोणालाही कोणतेही पैसे द्यावयाची गरज नाही. शासनाचे कोणतेही काम करण्यास शासकीय फीच्या व्यतिरिक्त घरकुलासाठी एखादी व्यक्त्ती पैशाची मागणी करत असल्यास पुराव्यांसह तक्रार जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे करावी. दोषी आढळल्यास संबंधितावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल.
– वैभव वाघमारे, सीईओ, जि. प.
0 Response to "जिल्ह्यात 63 हजारावर घरकुलांना मंजुरी. महा आवास योजना प्रभावी व पारदर्शक राबवा: सीईओ वाघमारे"
Post a Comment