
पालक सचिवांनी घेतला वाशिममध्ये विकास योजनांचा आढावा
साप्ताहिक सागर आदित्य
नवोपक्रमातून जिल्ह्याची प्रगती साधूया
पालक सचिव गणेश पाटील
पालक सचिवांनी घेतला वाशिममध्ये विकास योजनांचा आढावा
आकांक्षित जिल्हा असूनही प्रशासनाचे कामकाज कौतुकास्पद
वाशिम हा आकांक्षित जिल्हा असूनही येथे प्रशासन अत्यंत प्रभावीपणे कार्यरत आहे. विविध विकास योजना आणि शासकीय उपक्रम तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. कोणतीही योजना प्रलंबित राहू नये, नागरिकांना तिचा तातडीने लाभ मिळावा यासाठी आपण सर्व एकत्र मिळून समन्वयाने काम करू असे प्रतिपादन मृद व जलसंधारण विभागाचे सचिव तथा वाशिम जिल्ह्याचे पालक सचिव गणेश पाटील यांनी केले.
आज दि.२३ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात आयोजित आढावा बैठकीत
पाटील बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, उपवनसंरक्षक अभिजित वायकोस, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी तथा वाशिम उपविभागीय अधिकारी दादासाहेब दराडे, कारंजा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, मंगरूळपीर उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार निलेश पळसकर,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शाहा, प्रकल्प संचालक आत्मा अनिसा महाबळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. ठोंबरे, शिक्षणाधिकारी आकाश आहाळे यांसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी प्रास्ताविकातून जिल्ह्यात सुरू असलेल्या योजनांचा संक्षिप्त आढावा सादर केला. त्यानंतर पालक सचिव गणेश पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विकासकामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. नागरिकांना थेट लाभ मिळेल, अशी अंमलबजावणी व्हायला हवी. विशेषतः जलसंधारण प्रकल्प, कृषी विकास, आरोग्यसेवा आणि पायाभूत सुविधा यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
पाटील यांनी पुढे सांगितले की, जल जीवन मिशन अंतर्गत गावागावात शुद्ध पाणी पोहोचावे यासाठी प्रकल्प वेळेत पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. तसेच, जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामांना वेग द्यावा. कृषी क्षेत्रातील ‘आशिर्वाद व्हिजन’, ‘चिया पिक’, ‘जलतारा अभियान’ यांसारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेतली.
कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस विभागाने जनतेशी अधिक जवळीक साधावी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवावे," असेही त्यांनी स्पष्ट केले. पोलिस विभागाच्या माहितीचे सादरीकरण एसपी अनुज तारे यांनी केले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी प्रशासनाने अधिक प्रयत्नशील राहावे, जेणेकरून जिल्ह्यातील आरोग्यसेवा अधिक मजबूत होईल. माहितीचे सादरीकरण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सतिन मेश्राम यांनी केले.
सर्वच यंत्रणेच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सातत्याने आढावा घेत जिल्ह्यातील सर्व विकासकामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने अधिक तत्परतेने आणि जबाबदारीने कार्य करावे," असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस म्हणाल्या , जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित प्रयत्न सुरू आहेत. १०० दिवसांच्या कृती आराखड्यानुसार विकासकामे गतीने पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय साधून काम करणे आवश्यक आहे. प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांना जलसंधारण, आरोग्य, कृषी आणि पायाभूत सुविधा यांसारख्या सेवांचा जलद आणि प्रभावी लाभ मिळावा, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
पालक सचिव गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तळागाळातील जनतेपर्यंत योजनांचा लाभ पोहोचेल, यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणांना यावेळी केले.
कामकाजाचा आढावा :
बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी जिल्हा परिषदेच्या विविध कामकाजाची सविस्तर माहिती दिली. त्यांनी जिल्ह्यातील शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण, ग्रामीण पाणीपुरवठा, ग्रामविकास आणि कृषी क्षेत्रातील योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा सादर केला.
जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीमध्ये शिक्षण गुणवत्ता सुधारण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती सादर करण्यात आली.
आरोग्य विभागाच्या माध्यमातून हाती घेतलेल्या मोफत आरोग्य सेवा आणि लसीकरण मोहिमांचे विश्लेषण करण्यात आले.
कृषी योजनांचा आढावा घेतेवेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शाहा यांनी 'आशिर्वाद व्हिजन', 'चिया पिक' आणि 'जलतारा अभियान' यांसारख्या कृषी प्रकल्पांची माहिती दिली. पालक सचिवांनी या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचे आणि अधिकाधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले.
उमेद स्वयंरोजगार प्रोत्साहन योजनेंतर्गत महिला बचतगटांच्या सबलीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. तसेच, घरकुल योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वेळेत घरे मिळावीत, यासाठी अंमलबजावणी प्रक्रियेचा वेग वाढवण्याचे निर्देश पालक सचिवांनी दिले. माहितीचे विश्लेषण तथा सादरीकरण त्या त्या विभागाच्या विभाग प्रमुखांनी यावेळी सादर केले.
बैठकीत विविध योजनांची प्रगती, अडथळे आणि भविष्यातील कार्यवाही यावर सविस्तर चर्चा झाली. जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यासाठी नियमित आढावा बैठकांचे आयोजन करण्याचा निर्धार करण्यात आला.
पालक सचिव गणेश पाटील यांनी जिल्हा प्रशासनाच्या कामकाजाचे कौतुक करत शासकीय योजना प्रभावीपणे राबवून त्या शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवाव्यात. कोणतीही योजना प्रलंबित राहू नये, तिची अंमलबजावणी वेगाने व्हावी.असे निर्देश आढावा बैठकीत संबंधित यंत्रणेला दिले.
0 Response to "पालक सचिवांनी घेतला वाशिममध्ये विकास योजनांचा आढावा"
Post a Comment