
शंभर दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत उपविभागीय अधिकाऱ्यांची पार्डीटकमोर गावास भेट
साप्ताहिक सागर आदित्य
शंभर दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत उपविभागीय अधिकाऱ्यांची पार्डीटकमोर गावास भेट
वाशिम, – महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने निर्धारित केलेल्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या अनुषंगाने राज्यभरात विविध प्रशासकीय विभागांच्या पाहणीसाठी अधिकाऱ्यांच्या भेटींचे नियोजन करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज श्रीमती वैशाली देवकर, उपविभागीय अधिकारी, वाशिम यांनी पार्डीटकमोर, ता. वाशिम येथे दि.२४ फेब्रुवारी रोजी भेट देऊन विविध शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांची पाहणी केली.
या भेटीदरम्यान ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच तलाठी कार्यालयातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. अधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा आढावा घेत आवश्यक सुधारणा आणि उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
ग्रामपंचायतमध्ये आवश्यक सुधारणा सुचविल्या
ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाहणीत पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा पुरवठा सुरळीत करणे, तसेच अॅग्री स्टॅग योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी Farmer ID काढण्याची मोहिम गतीने राबविणे यासारख्या महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्राला नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेशही देण्यात आले.
तलाठी कार्यालयातील कामकाजाची पाहणी
तलाठी कार्यालयाच्या पाहणी दरम्यान शिक्षण कर आणि रोजगार हमीची यादी अद्यावत करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, कार्यालयात नागरिकांना माहिती मिळावी यासाठी भेटीचे निश्चित दिवस आणि माहितीफलक लावण्याच्या सूचना करण्यात आल्या. रब्बी पिक पाहणी पूर्ण करण्याबरोबरच, अॅग्री स्टॅग योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आणि तलाठी यांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश देण्यात आले.
जिल्हा परिषद शाळेचा आढावा – शिक्षण सुधारणा आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जिल्हा परिषद शाळेच्या पाहणी दरम्यान पालक सभा घेण्याचा आदेश देण्यात आला. निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्याच्या प्रभावी वापराबाबत शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांना संबोधित करताना अधिकाऱ्यांनी त्यांना शिक्षणाच्या महत्त्वाबाबत प्रोत्साहित केले. विशेष म्हणजे शाळेचा स्वच्छतेकडे कल असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले, तसेच मासिक प्रगती अहवाल ७८% असल्याचे स्पष्ट झाले.
प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी पद रिक्त, मात्र सेवा समाधानकारक
प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देताना मुख्य वैद्यकीय अधिकारी पद रिक्त असल्याची बाब समोर आली. मात्र आरोग्य सेविकांचे कार्य समाधानकारक असून, आरोग्य सहायकांचे काही पदे रिक्त असल्याचे निदर्शनास आले.
दररोज १५० रुग्ण ओपीडी मध्ये उपचार घेत आहेत.
मुख्यतः तापाच्या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले.
औषधसाठा पुरेसा असून, रक्त तपासणी व इतर वैद्यकीय सुविधा नियमित सुरू आहेत.
कुटुंब नियोजनासाठी दाखल असलेल्या रुग्णांची प्रकृती उत्तम असल्याचे आढळले.
या पाहणी दौऱ्यादरम्यान ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, जिल्हा परिषद शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यपद्धतीचा सखोल आढावा घेण्यात आला. प्रशासनातील सुधारणा आणि कार्यक्षमतेसाठी महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या असून, ग्रामस्थांच्या मूलभूत सुविधांमध्ये लवकरच सुधारणा होण्याची अपेक्षा असल्याचे उपविभागीय अधिकारी श्रीमती देवकर यांनी सांगितले.यावेळी संबंधित वैद्यकीय अधिकारी,मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
0 Response to "शंभर दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत उपविभागीय अधिकाऱ्यांची पार्डीटकमोर गावास भेट"
Post a Comment