-->

मिनी मंत्रालयात विकास कामांवर मंथन.  सीईओ वैभव वाघमारे यांची 10 तासांची मॅरेथॉन  सभा   उल्लेखनीय कामांचा घेतला आढावा  बोलक्या शाळा आणि वृक्षारोपणावर भर.

मिनी मंत्रालयात विकास कामांवर मंथन. सीईओ वैभव वाघमारे यांची 10 तासांची मॅरेथॉन सभा उल्लेखनीय कामांचा घेतला आढावा बोलक्या शाळा आणि वृक्षारोपणावर भर.



 साप्ताहिक सागर आदित्य 

मिनी मंत्रालयात विकास कामांवर मंथन.

सीईओ वैभव वाघमारे यांची 10 तासांची मॅरेथॉन  सभा 

उल्लेखनीय कामांचा घेतला आढावा

बोलक्या शाळा आणि वृक्षारोपणावर भर.


जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी जिल्ह्यातील विकास अधिकारी यांची तब्बल दहा तास मॅरेथॉन बैठक घेऊन ग्रामपंचायत स्तरावरील विविध विकास कामांचा आढावा घेतला. विभाग प्रमुखांनी करावयाची तीन उल्लेखनीय कामांचा तसेच जिल्ह्यातील शाळा बोलक्या करणे आणि ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे यावर प्रामुख्याने बैठकीत भर देण्यात आला. सीईओ यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 10 वाजता सुरु  झालेली मॅरेथॉन बैठक रात्री 8 वाजेपर्यंत चालली.

यापुढे दर महिन्याला जिल्ह्यातील विकास अधिकाऱ्यांची बैठक होणार असून यामध्ये जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख, सर्व गट विकास अधिकारी, सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी, सर्व तालुका शिक्षण अधिकारी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व तालुका पशुधन विकास अधिकारी आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे सर्व उप अभियंता यांचा समावेश राहणार असल्याची माहिती बैठकीच्या सुरुवातीला देण्यात आली. सीईओ यांनी सर्व विभागप्रमुखांचा योजना व विषयनिहाय सविस्तर आढावा घेतला.

सुरुवातीला वित्त विभागाचा आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषदेच्या इमारतीत सुशोभीकरणाची १५० झाडे लावण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती कॅफो दिनकर जाधव यांनी दिली. सेस फंडाचे उत्पन्न वाढल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी दिनकर जाधव यांचे सीईओ वाघमारे यांनी अभिनंदन केले.

पंचायत विभाग विभागामार्फत प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये किमान 700 आणि तालुकास्तरावर किमान ५० हजार वृक्षारोपण करण्याचे लक्ष देण्यात आले असून याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

ज्या तालुक्यांमध्ये झाडे लावण्यासाठी खड्डे खोदण्यात आली आहेत तिथे झाडे लावण्याची कारवाई त्वरित करावी. तसेच मोठी झाडे उपलब्ध होत नसल्यास छोटी- छोटी रोपे लावण्याचे काम पूर्ण करावे तसेच २०० झाडामागे एक मजूर लावून वृक्षाचे संगोपन करण्याबाबतही निर्देश देण्यात आले.

१५ व्या वित्त आयोगांतर्गत 15 जुलै पर्यंत ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावरील खर्च हा 70 टक्के पर्यंत दिसावा असे सांगुन वित्त आयोगाच्या खर्चाबाबत उदासीनता खपवून घेणार नसल्याचा इशारा सीईओ वाघमारे यांनी बैठकीत दिला. पंचायत विकास निर्देशांकामध्ये (पीडीआय) जिल्हा रेड झोनमध्ये येणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही सीईओ यांनी दिले. यासाठी आवश्यकता भासल्यास कारवाईचे सत्र सुरू करण्याचे निर्देशही गट विकास अधिकारी व विभाग प्रमुखांना देण्यात आले.

जिल्ह्यामध्ये एकूण 83 नवीन ग्रामपंचायतच्या इमारतीच्या कामांना मंजुरी मिळाली असून यापैकी 80 इमारतीची कामे पूर्ण झाली आहेत. तीन ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे कामे थांबविण्यात आले आहेत. या तीनही ठिकाणी पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट देऊन प्रश्न मार्गी लावण्याची निर्देश सीईओ वाघमारे यांनी दिले. येणाऱ्या दहा दिवसात जिल्ह्यामध्ये सर्व ग्रामपंचायतला स्वतंत्र इमारत असल्याची खात्री करावी तसेच ज्या ठिकाणी इमारत नाही अशा ग्रामपंचायतीला मातोश्री अंतर्गत नवीन इमारतीचा प्रस्ताव सादर केला असल्याबाबत खात्री करण्याचे निर्देश पंचायत विभागाला देण्यात आले.

---------------------------------------------

यापुढे गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांचा सीआर लिहिताना 50% भर हा मालमत्ता कर व पाणीपट्टी कर किती गोळा केला यावर राहणार चे सीईओ वाघमारे यांनी सांगितले.

त्यामुळे सर्व ग्रामपंचायतीमध्ये मालमत्ता व पाणीपट्टी कर गोळा करण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

--------------------------------------------

विकास अधिकाऱ्याच्या बैठकीमध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कामांचा आढावाही घेण्यात आला. विशेषतः घरकुलाचा लाभ देताना जे अगदी पात्र लाभार्थ्या आहेत ते सुटू नये आणि अपात्र लाभार्थ्यांना किंवा चुकीच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात येऊ नये अशा सूचना देण्यात आल्या. याबाबत गटविकास अधिकारी, ग्रामसेवक आणि आरएचइ यांनी विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले. 

विविध घरकुलाच्या कामामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे आणि त्यांच्या टीमचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले. यांच्या कामामुळे राज्यस्तरावर वाशिम जिल्हा नेहमी टॉप टेन मध्ये असतो, तो आता टॉप थ्री किंवा फाईव्ह वर जावा अशी अपेक्षा यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी बोलून दाखविली.

----------------------------------------------

ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचाही यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. येणाऱ्या वर्षात एकाही गावात पाणीटंचाई भासणार नाही व विहीर अथवा हातपंप अधिग्रहण करण्याची गरज पडणार नाही याबाबत योग्य कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती विभागाचे कार्यकारी अभियंता अजिंक्य वानखेडे यांनी दिली. जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना पूर्ण झालेल्या प्रत्येक तालुक्यातुन एक याप्रमाणे यातील सहा गावामध्ये वॉटर मीटर व स्वयंचलित यंत्रणा बसविण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश वाघमारे यांनी दिले.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय, सेग्रिगेशन शेड आणि ओडीएफ प्लस अंतर्गत मॉडेल गावे करण्याबाबत यावेळी आढावा घेण्यात आला. पुढील एका महिन्यात राहिलेली 23 गावे अस्पायरिंग या घटकामध्ये गेली पाहिजे तसेच दर महिन्याला किमान 20 गावे ही मॉडेल या घटकांमध्ये गेली पाहिजे या दृष्टीने काम करण्याचे निर्देश सीईओ वाघमारे यांनी दिले. सार्वजनिक शौचालयाचे काम शंभर टक्के झाले असल्याबाबत प्रकल्प संचालक जगदीश साहू, सर्व गटविकास अधिकारी आणि इंजिनीयर अमित घुले यांचे सीईओ वाघमारे यांनी अभिनंदन केले.

जिल्ह्यामध्ये 138 अंगणवाड्या बोलक्या करण्यात आल्या असून 403 अंगणवाड्या बोलक्या करण्याचे काम सुरू असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे यांनी दिली. पुढील बैठकीमध्ये 700 पेक्षा अधिक अंगणवाड्या बोलक्या करण्याचे आश्वासन जोल्हे यांनी दिले. यावेळी चांगले काम केल्याबद्दल जोल्हे यांच्यासह सीडीपीओ, बीडिओ, सीडीपीओ आणि पालक अधिकारी यांचे सीईओ वाघमारे यांनी अभिनंदन केले.

 बैठकीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे यांनी शिक्षण विभागाचा सविस्तर आढावा घेतला. यामध्ये बोलक्या शाळा करणे आणि विद्यार्थ्यांना अध्ययन निष्पत्ती नुसार मूलभूत ज्ञान व कौशल्य येणे याबाबत सर्व उपशिक्षणाधिकारी यांना निर्देश देण्यात आले. एक जुलैपर्यंत प्रत्येक तालुक्यामधून सहा शाळा बोलक्या करण्याचे आणि डिसेंबर अखेर सर्व शाळा विहित पाच मुद्द्यानुसार बोलक्या करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

समाज कल्याण विभाग, पशु संवर्धन विभाग, कृषी विभाग, लघु सिंचन आणि बांधकाम विभागांचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने विभाग प्रमुखांनी करावयाची उल्लेखनीय कामे यांचा समावेश होता.

बैठकीला सीईओ वैभव वाघमारे यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे, मुख्यालेखा वित्त अधिकारी दिनकर जाधव, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपकाळे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश साहू, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मारोती वाठ, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आनंद राजुस्कर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजिंक्य वानखेडे, शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. जयश्री केंद्रे, लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता संदेश चवरे, कृषी अधिकारी गणेश गिरी यांची उपस्थिती होती. सर्व विभाग प्रमुखांनी यावेळी आपल्या विभागातील कामाचा आढावा घेतला.

-------------------------------------------------

0 Response to "मिनी मंत्रालयात विकास कामांवर मंथन. सीईओ वैभव वाघमारे यांची 10 तासांची मॅरेथॉन सभा उल्लेखनीय कामांचा घेतला आढावा बोलक्या शाळा आणि वृक्षारोपणावर भर."

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article