
आकांक्षाला मिळाले उच्च शिक्षणासाठी पंख.... (जाधव महाविद्यालयाची सामाजिक बांधिलकी
साप्ताहिक सागर आदित्य
आकांक्षाला मिळाले उच्च शिक्षणासाठी पंख....
(जाधव महाविद्यालयाची सामाजिक बांधिलकी)
स्थानिक श्री तुळशीरामजी जाधव कला व विज्ञान महाविद्यालयाने आकांक्षा तायडे यांना बि.एस्सी.भाग एक करीता निःशुल्क प्रवेश दिला व तिच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. श्री तुळशीरामजी जाधव महाविद्यालय सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रणी असणारे महाविद्यालय मानले जाते. ग्रामीण भागातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची दालने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने संस्थेचे अध्यक्ष ॲड. विजयरावजी जाधव यांनी आपल्या वडिलांच्या नावाने १९९९-२००० मध्ये महाविद्यालयाची स्थापना केली. शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे तो सर्वांना मिळालाच पाहिजे असा आग्रह तुळशीरामजी जाधव यांचा होता. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रांमध्ये आज मोठ्या प्रमाणात व्यावसायिक दृष्टिकोन विकसित होताना दिसून येत आहे. परंतु अशाही परिस्थितीत शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन शिक्षणाची गंगा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने आजही होतकरू विद्यार्थ्यांना निशुल्क प्रवेश देणारे एकमेव महाविद्यालय म्हणून श्री तुळशीरामजी जाधव महाविद्यालयाची ओळख आहे विज्ञान शाखेकरीता मोठ्या प्रमाणात प्रवेश घेण्याकरीता स्पर्धा आहे. त्यामुळे इतर महाविद्यालय अधिक प्रमाणात शुल्क आकारून विद्यार्थ्यांना प्रवेश देतात, परंतु श्री तुळशीरामजी जाधव महाविद्यालयाने आकांक्षासारख्या आई-वडील नसणाऱ्या मुलीला निशुल्क प्रवेश देऊन तिची उच्च शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्विकारली आहे. संस्थेचे सचिव ॲड विजयराव जाधव यांच्या हस्ते आकांक्षाचा प्रवेश निश्चित करण्यात आला. तसेच पुढील भविष्य उज्वल व्हावे यासाठी तिला मार्गदर्शन देखील करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष जाधव यांनी आकांक्षाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व महाविद्यालय आकांक्षाचे पालकत्व स्विकारेल अशी ग्वाही दिली. तसेच महाविद्यालयामध्ये शिष्यवृत्ती योजना, कमवा व शिका योजना, दत्तक विद्यार्थी योजना,यासारखे उपक्रम सुरू असल्याचे सांगितले. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये याकरिता सदर उपक्रम मोलाचा ठरतो आहे. यावेळी प्रा. डॉ. पदमानंद तायडे आकांक्षाचे पालक तुकारामजी तायडे व पाचरणे हे उपस्थित होते.
0 Response to "आकांक्षाला मिळाले उच्च शिक्षणासाठी पंख.... (जाधव महाविद्यालयाची सामाजिक बांधिलकी"
Post a Comment