
स्मार्ट फोन ठरु शकतो ॲलर्जीचे कारण! : जाणून घ्या स्मार्ट फोन आणि ॲलर्जीचे 'कनेक्शन'
स्मार्ट फोन ठरु शकतो ॲलर्जीचे कारण! : जाणून घ्या स्मार्ट फोन आणि ॲलर्जीचे 'कनेक्शन'
ॲलर्जी हा शब्द उच्चारला तरी कोणत्या तरी घटकाचा शारीरिक त्रास हे प्रत्येकाला माहित असते. कोणाला धुळीची तर कोणाला दूग्धजन्य पदार्थांची ॲलर्जी असते. ( Smartphone and Allergy ) कोणत्याही घटकाची ॲलर्जी निर्माण होऊ शकते. यामुळे काही काळ शारीरिक त्रास होतो. हा अल्पकाळच त्रास असल्याने बहुतांश जणांचे त्याकडे दुर्लक्ष होते. अलीकडे जगभरात ॲलर्जीचे प्रमाण वाढत चालले आहे. आता नवीन संशोधनात तुमचा स्मार्ट फोनही ॲलर्जीचे कारण ठरु शकतो, असे सिद्ध झाले आहे. जाणून घेवूया या नवीन संशोधनाविषयी …
स्मार्टफोन आणि ॲलर्जी यासंदर्भात अमेरिकेतील ॲरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये संशोधन करण्यात आले. या संशोधनाचा अहवाल नुकताच अमेरिकन कॉलेज ऑफ ॲलर्जी, अस्थमा आणि इम्युनोलॉजीच्या वार्षिक वैज्ञानिक बैठकीत सादर करण्यात आला.
संशोधनात आढळले हे ॲलर्जीक घटक
संशोधकांनी संशोधनात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांचे स्मार्टफोन तपासले. यासाठी इलेक्ट्रोस्टॅटिक वाइप्स वापरण्यात आले. या माध्यमातून ॲलर्जीसाठी कारणीभूत ठरणारे घटक मोजले गेले. संशोधनात मांजर आणि कुत्र्याच्या केसातील कोंडा, भिंतीवर आढळणार्या बुरशीजन्य पेशी, पाळीव प्राण्यांचे केस, कपडे आणि पादत्राणामुळे निर्माण होणारे ॲलर्जीक घटक स्मार्टफोनच्या माध्यमातून मानवी शरीराच्या संपर्कात येत असल्याचे आढळले.
… तर स्मार्टफोन ठरताे ॲलर्जी वाहक
संशोधनात असे आढळले आहे की, घरातील पाळीव प्राणी कुत्रा, मांजर तसेच भिंतीवरी बुरशीजन्य पेशी यांच्या संपर्कात आलेले स्मार्टफोन हे ॲलर्जीचे वाहक ठरतात. पाळीव प्राण्यांच्या मालकांच्या स्मार्ट फोनमध्ये मांजर आणि कुत्र्याचे ॲलर्जीन आढळले आहेत. पाळीव प्राणी कुत्रा आणि मांजर यांच्या संपर्कात आलेल्या स्मार्टफोनला पाळीव प्राण्यांच्या केसातील कोंडा चिकटू शकतो. यानंतर तुम्ही तुमच्या फोनला स्पर्श केला आणि नंतर तुम्ही तुमचे डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श केला तर ॲलर्जीन तुमच्या नाकात, डोळा किंवा श्वसनमार्गामध्ये किंवा डोळ्याच्या श्लेष्मल त्वचेत प्रवेश करू शकतात. स्मार्टफोन हे नेहमीच तुमच्याबरोबरच असतात. त्यामुळे ते ॲलर्जी वाहक ठरण्याची शक्यता असते.
कोणती काळजी घ्यावी?
२०१६ मधील एका अहवालानुसार, स्मार्टफोन वापरकर्ते दररोज २,६०० पेक्षा अधिक वेळा आपल्या फोनला स्पर्श करतात असे आढळले होते. त्यामुळे ज्यांना यापूर्वीच एखाद्या घटकाची ॲलर्जी असेल किंवा दमा असेल त्यांनी अधिक काळजी घेणे आवश्यक ठरते. ॲलर्जीचा त्रास किंवा दमा असलेल्या लोकांनी धोका कमी करण्यासाठी स्मार्ट फोन नियमित स्वच्छ ठेवला पाहिजे. यामुळे ॲलर्जीचा धोका पूर्णत: टाळता येत नसला तरी ॲलर्जी व दमा याचा त्रास कमी करता येवू शकतो, असेही या संशोधनात नमूद करण्यात आले आहे.
तुमच्या फोनवर गळालेले केस काढून टाकणे आणि फोन नियमित स्वच्छ ठेवणे फायद्याचे ठरते. तुम्ही तुमचा स्मार्टफोन कितीवेळा स्वच्छ करावा, याचे कोणतेही अचूक सूत्र नाही; परंतु त्याची नियमित सवय ठेवणे हे आरोग्यासाठी लाभदायक ठरते, असेही या संशोधनात स्पष्ट करण्यात आले आहे. आजपासून तुम्ही स्मार्टफोन वापरताना त्यांच्या स्वच्छेतकडे जाणीवपूर्वक लक्ष ठेवा. कारण तुमचे दुर्लक्ष हे नव्या ॲलर्जी त्रासाचे कारण ठरु शकते.
0 Response to "स्मार्ट फोन ठरु शकतो ॲलर्जीचे कारण! : जाणून घ्या स्मार्ट फोन आणि ॲलर्जीचे 'कनेक्शन'"
Post a Comment