जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रानभाजी महोत्सवाचे उदघाटन
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते
रानभाजी महोत्सवाचे उदघाटन
वाशिम, : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज 15 ऑगस्ट रोजी कृषी विभागाच्या वतीने आयोजित रानभाजी महोत्सवाचे उदघाटन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आत्मा कार्यालयाच्या परिसरात केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आ. राजेंद्र पाटणी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, उपजिल्हाधिकारी नितीन जाधव, जिल्हा अधिक्षक भुमी अभिलेख शिवाजी भोसले, उपविभागीय कृषी अधिकारी निलेश ठोंबरे व तालुका कृषी अधिकारी कंकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
रानभाजी महोत्सवामध्ये शेतकरी महिला बचतगट, महिला आर्थिक विकास महामंडळाचे बचतगट व उमेद बचतगटांनी तसेच शेतकरी गटांनी विविध रानभाज्यांचे स्टॉल लावले होते. यामध्ये कटुले, गोंदन फुलोरा, कसन भाजी, अंबाडी, कारमोडी, कपाडफोडी, रानभेंडी, शेंदोलीकंद, फांज, तरोटा, झिनीया, घोरपडी, गुळवेल, सुरजकंद, घोरकाकडी, चुचुची भाजी, कामोनी, टंटनी, केना, म्हैसवेलाकी पाने, भराटी, गुळमेंडी, माळकामोनी, काबीलवेल, हडसन, रानकरडी, कवठ, जंगली मशरुम, बेल, करडई, रानशेपु, तांदुळकुंद्रा, मोठा वावडींग, कळमकोसला, रानघोळ, करडुची भाजी, काठेमाठ भाजी, पांढरामाठ, शेवग्याचा फुलोर, पानफुटी, वासनवेल भाजी, कंबरमोडी, पिंपळ कावळा, नाळची भाजी व तुपगेल भाजी आदी रान भाज्यांचा समावेश होता. मान्यवरांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन रानभाज्यांची उपयुक्तता त्यांचे आहारातील महत्व या विषयीची माहिती जाणून घेतली. तसेच नागरीकांनी आपल्या दैनंदिन आहारामध्ये रानभाज्यांचा समावेश करावा. असे आवाहन देखील मान्यवरांनी यावेळी केले. या महोत्सवामध्ये एस.एन फार्मर प्रोडयुसर कंपनी लिमिटेड यांचे लाकडी व लोखंडी घाण्याचे तेल विक्रीसाठी उपलब्ध होते. यामध्ये करडई, तीळ, शेंगदाणा व सुर्यफुल तेलांचा समावेश होता.
0 Response to "जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रानभाजी महोत्सवाचे उदघाटन"
Post a Comment