उत्कृष्ट कामगिरीबद्दल विविध क्षेत्रातील व्यक्ती, पंचायत समिती व ग्रामपंचायती सन्मानीत · चार लाभार्थ्यांना जमीन वाटप आदेश वितरीत
साप्ताहिक सागर आदित्य
उत्कृष्ट कामगिरीबद्दल विविध क्षेत्रातील
व्यक्ती, पंचायत समिती व ग्रामपंचायती सन्मानीत
· चार लाभार्थ्यांना जमीन वाटप आदेश वितरीत
· सलग 25 वर्षे संचालन करणारे मोहन शिरसाट यांचा सत्कार
वाशिम, : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज 15 ऑगस्ट रोजी मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, पंचात समिती, ग्रामपंचायतींचा तसेच सलग 25 वर्षापासून 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 1 मे या मुख्य शासकीय कार्यक्रमांचे सुत्रसंचालन करणारे शिक्षक मोहन शिरसाट यांचा यावेळी प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आ. राजेंद्र पाटणी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रारंभी वीरमाता पार्वती लहाने व वीरपत्नी शांताबाई सरकटे यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल जिल्हा सामान्य रुग्णालय व डॉ. बाजड हॉस्पीटल आणि कोविड काळामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिल्हा सामान्य रुगणालयाचे डॉ. उमेश मडावी, सामाजिक वनीकरण विभागांतर्गत राष्ट्रीय हरीत सेना या योजनेअंतर्गत एसएमसी इंग्लीश स्कुल, वाशिम येथील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपुरक उपक्रम राबविल्याबद्दल शिक्षक अभिजीत जोशी व विद्यार्थी सुमित ढोणे यांना पर्यावरण उपक्रम सन 2022 चा पर्यावरण पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल, ग्रामीण भागात गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी महाआवास अभियान या अंतर्गत सर्वोत्कृष्ट पंचायत समिती म्हणून वाशिम, कारंजा आणि रिसोड पंचायत समितीचे सभापती व गटविकास अधिकारी, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायती म्हणून वाशिम तालुक्यातील अनसिंग, टनका व चिखली (बु.) येथील सरपंच व ग्रामसेवक यांचा, सर्वोत्कृष्ट क्लस्टर म्हणून अनसिंग, सर्वोत्कृष्ट प्रोग्रामर म्हणून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील अश्विनी उजवणे, सर्वोत्कृष्ट ऑपरेटर म्हणून गणेश कव्हर, राज्य पुरस्कृत आवास योजना ग्रामीणमध्ये सर्वोत्कृष्ट तालुके म्हणून वाशिम, कारंजा आणि मंगरुळपीर, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायती म्हणून वाशिम तालुक्यातील अडोळी, ब्रम्हा आणि उकळीपेन आणि सर्वोत्कृष्ट क्लस्टर म्हणून वाशिम तालुक्यातील पार्डी टकमोरचा आणि सन 2020-21 व 2021-22 या वर्षाचा आदर्श तलाठी पुरस्कार कारंजा तहसिल कार्यालय येथील तलाठी व्ही.डी. नागुलकर आणि एस.जी. मुंडाले यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ, प्रशस्तीपत्र आणि गौरवचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले.
सामाजिक न्याय विभागाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत सन 2022-23 या वर्षात इश्वर चिठ्ठीने निवड झालेल्या मानोरा तालुक्यातील कारपा येथील देविदास खंडारे व पिंप्री येथील दत्ता मनवर, मंगरुळपीर तालुक्यातील बोरव्हा (खु.) येथील समाधान भगत आणि मानोरा तालुक्यातील कारपा येथील श्रीमती शितल इंगोले या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते जमीन वाटपाचे आदेश वितरीत करण्यात आले. एकूण 5 लाभार्थ्यांना 13.58 एकर जमीन कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत देण्यात आली आहे.
यावेळी अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक डॉ. विनोद वानखेडे, कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. विजय काळबांडे, डॉ. धर्मपाल खेळकर व जिल्हा जलसंधारण अधिकारी सुभाष आकोसकर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संचालन मोहन शिरसाट यांनी केले.
0 Response to "उत्कृष्ट कामगिरीबद्दल विविध क्षेत्रातील व्यक्ती, पंचायत समिती व ग्रामपंचायती सन्मानीत · चार लाभार्थ्यांना जमीन वाटप आदेश वितरीत"
Post a Comment