
शेतात साचलेले पाणी बाहेर काढून पिकांचे संरक्षण करा कृषी विभागाचे आवाहन
साप्ताहिक सागर आदित्य
शेतात साचलेले पाणी बाहेर काढून
पिकांचे संरक्षण करा
कृषी विभागाचे आवाहन
वाशिम, : जिल्हयात मागील एका महीन्यापासून सतत पाऊस पडत आहे. ढगाळ वातावरणामुळे अनेक ठिकाणच्या जमीनीत पाणी साचलेले आहे. पाणथळ जमीनी चिभडल्याचे दिसुन येत आहे. वापसा
नसल्यामुळे पिकांना जमीनीतून अन्नद्रव्य घेण्यास अडचण येत आहे. सुर्यप्रकाश नसल्याने पिकांना स्वतःचे अन्नद्रव्य तयार करण्यास अडथळे निर्माण झाले आहे. त्यामुळे पिकांची वाढ प्राथमिक अवस्थेत खुंटल्याचे व सखल भागातील पिके पिवळी पडल्याचे दिसून येत आहे. बहुतांश ठिकाणी वरंब्यावर लागवड न केलेल्या ठिकाणचे तुर पिक जळाल्याचे आढळून आले आहे. अशा परिस्थितीत पिकातील साचलेले पाणी बाहेर काढावे व वापसा येताच पिक फुलांवर येण्यापूर्वी पिकामध्ये डवरणी किंवा निंदन करुन तण नियंत्रण करावे. 19:19:19 विद्राव्य खताची 50 ग्रॅम आणि सुक्ष्म मुलद्रव्य ग्रेड-2, 50 मिली 10 लीटर पाण्यात घेऊन फवारणी करावी.
ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन व तुर आंतरपिक घेतलेले असेल व अति पावसामुळे तुरीचे पिक जळाले असेल अशा ठिकाणी दुबार पिक जसे गहु, हरभरा, रब्बी ज्वारी इत्यादी पिके घ्यावयाची नसल्यास अशा ठिकाणी तुरीच्या लवकर येणाऱ्या वाणाची लागवड करावी. यामध्ये तुर आयसीपीएल 88039, फुले राजेश्वरी, बीडीएन 711, एकेटी 8811 या वाणाचा समावेश आहे.
ज्या शेतकऱ्यांना दुबार पिक घ्यावयाचे आहे अशा ठिकाणी तुर पिक जळालेले आहे, यामध्ये मृतसरी काढुन घेतल्यास पुढे होणाऱ्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे संभाव्य नुकसान टाळता येईल. हवामान खात्याचे अंदाजानुसार ऑगष्ट व सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीचा अंदाज वर्तविला आहे. याकरीता पुढील कालावधीत आपल्या पिकांचे रक्षण करण्याकरीता शेतात दर सहा ओळीनंतर मृतसरी काढल्यास पडलेले पाऊसाचे पाणी निघुन जाण्यास मदत होईल व सोयाबीन पिकाची वाढ चांगली होऊन नुकसान टाळता येईल व उत्पादनात निश्चीत वाढ होईल.
जिल्हयात मागील महीन्यापासुन सतत पडत असलेल्या पावसामुळे जे सोयाबीन सरी वरंबा, बीबीएफ, अमरपट्टा पेर व सरीवर लागवड करण्यात आलेली सोयाबीनची पिक परिस्थीती समाधानकारक आहे. भविष्यात पावसामुळे होणारे नुकसान लक्षात घेता आधुनिक पध्दतीने सोयाबीन पिकाची लागवड केल्यास निविष्ठांवरील खर्चात बचत होऊन निव्वळ उत्पन्न वाढण्यास मदत होईल. असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व कृषी संशोधन केंद्र वाशिमचे प्रभारी अधिकारी यांनी कळविले आहे.
0 Response to "शेतात साचलेले पाणी बाहेर काढून पिकांचे संरक्षण करा कृषी विभागाचे आवाहन"
Post a Comment