जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही - पालकमंत्री शंभूराज देसाई
साप्ताहिक सागर आदित्य/
जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही - पालकमंत्री शंभूराज देसाई
जिल्हा परिषद हिरक महोत्सव समारंभ
वाशिम - पंचायत राज व्यवस्थेला आज ६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने राज्यात हिरक महोत्सव साजरा करण्यात येत आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या त्री सुत्रीचा वापर करून राज्यात पंचायत राज्य व्यवस्था प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. वाशीम जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न कमी असल्याने आणि विकासाच्या बाबतीत जिल्हा मागे असल्याने वाशिम आकांक्षीत जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जिल्ह्याला लागलेला मागासलेपणाचा हा डाग पुसून काढून जिल्ह्याला नवी ओळख देण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
आज १ मे रोजी जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात हिरक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून देसाई बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार किरणराव सरनाईक आमदार अमित झनक, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, उपाध्यक्ष डॉ.श्याम गाभणे, शिक्षण व आरोग्य समिती सभापती चक्रधर गोटे, अर्थ व बांधकाम समिती सभापती सुरेश मापारी,महिला व बालकल्याण समिती सभापती शोभा गावंडे,समाज कल्याण समिती सभापती वनिता देवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
देसाई म्हणाले की, ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी जागरुक राहून लोकांसाठी कार्य करण्याची अधिक गरज आहे. अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका बाळगल्यास विकास होण्यास मोलाची मदत होईल. जिल्हा परिषदेत रिक्त पदासह काही समस्या आहेत, त्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. येत्या काही दिवसात जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या अनुशेषाबाबत आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे ते म्हणाले.
जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती देऊन विकासात्मक कामासाठी निधीची गरज असून पालकमंत्र्याकडे निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली.
यावेळी आजी माजी जिल्हा परिषद सदस्यांनी तसेच मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेतील विद्यार्थ्यांनी अनेक देशभक्ति गीते सादर केली.
त्या ४ अनाथ बालकांना धनादेश वितरीत
कोविडच्या काळात कोरोनामुळे ज्या मुलांचे पालक गमावले अशा जिल्ह्यातील ४ चार बालकांच्या नावे राज्य शासनाकडून मुदत ठेव काढण्यात आली. यावेळी पालकमंत्री मंत्री देसाई यांच्या हस्ते ऋषिकेश शिंदे, सतीश जाधव, अक्षरा जाधव, साहिल इंगोले याना धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.
माजी अध्यक्ष, सदस्याचा सत्कार
राज्यात पंचायत राज व्यवस्थेला ६० वर्षे पूर्ण होत असल्याने राज्यात हिरक महोत्त्सव साजरा होत आहे. त्यानिमित्ताने जिल्ह्यातील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, सदस्याचे पुष्पगुच्छ देऊन यावेळी सत्कार करण्यात करण्यात आला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, सदस्य उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषद वाशिमच्या वतीने संत गाडगेबाबांच्या वेश भुषेतून जिल्हयातील गावागावात जाऊन स्वच्छता जनजागृती, कोरोना जनजागृती व अंधश्रध्दा निर्मुलनाचा संदेश देणारे सामाजिक कार्यकर्ते पी.एस. खंदारे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, अन्य अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन उपशिक्षणाधिकारी दाभेराव व शिक्षक मोहन सिरसाट यांनी संयुक्तपणे केले.
0 Response to "जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही - पालकमंत्री शंभूराज देसाई"
Post a Comment