पोहरादेवी यात्रेच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
साप्ताहिक सागर आदित्य/
पोहरादेवी यात्रेच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
वाशिम - देशातील कोट्यवधी बंजारा समाज बांधवांचे श्रध्दास्थान असलेल्या मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराज यांच्या समाधीस्थळी येत्या १० एप्रिल रोजी होणाऱ्या रामनवमी यात्रा महोत्सवाच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी आज १ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटाक सभागृहात आयोजित सभेत घेतला.
या पूर्वतयारी आढावा सभेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत,अप्पर पोलीस अधिक्षक गोरख भामरे,निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे,कारंजा उपविभागीय अधिकारी राहूल जाधव, कारंजा उपविभागीय पोलीस अधिकारी जगदिश पांडे,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख,वीज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता एम.एस.वैद्य, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विजय काळबांडे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे,जि.प. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी.सी.खारोडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता घुगे,जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आलोक अग्रहरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.विनोद वानखेडे,मानोरा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी एस. एम.पंडे, मानोरा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र चापे, मानोरा पोलीस निरिक्षक सुनिल जाधव,अन्न व औषध प्रशासनाचे निरिक्षक एन.आर. ताथोड,सुनिल महाराज,जितेद्र महाराज, यशवंत महाराज,खुशाल महाराज,माजी जि.प.अध्यक्ष दिलीप जाधव, सार्वजनिक बांधकामचे उपविभागीय अभियंता ए.सी.खोडे, भारत संचार निगम लिमीटेडचे उपविभागीय अभियंता दाभाडे, सर्व नगर पालीकांचे मुख्याधिकारी व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
षण्मुगराजन यावेळी म्हणाले,यात्रेनिमित्त पोहरादेवी येथे येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी संबंधित यंत्रणांनी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी समन्वयातून काम करावे.यात्रेच्या कालावधीत पोहरादेवी येथे आरोग्य विभागाने २४ तास दोन आरोग्य पथके तैनात ठेवावी.दोन रूग्णवाहिका उपलब्ध असाव्यात.पोहरादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असावा.ज्या स्त्रोतामधून पाणी उपलब्ध होणार आहे त्याची तपासणी करण्यात यावी. पाण्यामध्ये ब्लिचींग पावडर टाकून पाण्याचे निर्जंतुकीकरण करावे. यात्रेदरम्यान २४ तास वीज पुरवठा सुरु ठेवावा.अवैध वीज जोडणी करणाऱ्यांवर कारवाई करावी.असे त्यांनी सांगितले.
पोहरादेवीकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांची तातडीने दूरुस्ती करण्याची कामे संबंधित विभागाने सुरु करावी. असे सांगून षण्मुगराजन म्हणाले, रस्त्यावर असलेली अतिक्रमणे त्वरीत काढण्यात यावी.यात्रेदरम्यान उघडयावर कोणताही भाविक शौचास जाणार नाही यासाठी तात्पुरती शौचालये सार्वजनिक बांधकाम विभागाने उभारावी.कचरा व प्लॅस्टीकची योग्यप्रकारे विल्हेवाट लावावी.पोहरादेवीच्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतींना देख्रील पाण्याची व्यवस्था उपलब्ध करुन द्यावी. मच्छरांचा प्रतिबंध करण्यासाठी पोहरादेवी येथे फॉगींग मशीन, स्वच्छतेसाठी पुरेसे मनुष्यबळ, अग्नीशमन यंत्रणा व घंटागाडयांची व्यवस्था करण्यात यावी.असे ते यावेळी म्हणाले,
षण्मुगराजन म्हणाले, दर्शन घेतांना भाविकांना अडचण निर्माण होणार नाही याकरीता पोलीस विभागाने बॅरीकेटसची व्यवस्था करावी.यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था, गुन्हे नियंत्रण व सुरक्षेकडे पोलीसांनी लक्ष द्यावे. पोहरादेवीपासून चारही बाजुला बाहेर पार्कीगची व्यवस्था करावी.यात्रेदरम्यान भाविकांची गर्दी राहणार असल्यामुळे पोलिसांनी वाहने गावात येऊ देवू नये. यात्रेदरम्यान भाविकांकडून बोकडांचा नवस म्हणून बळी जाणार नाही याकडे पशुसंवर्धन विभागाने काळजीपुर्वक लक्ष द्यावे.यात्रेदरम्यान अवैध दारु विक्री, संदेशवहन यंत्रणा व नेटवर्क सेवा विस्कळीत होणार नाही याबाबत संबंधित यंत्रणा दक्ष असावी. उपहारगृहे, खाद्यपदार्थाच्या दुकानांना तात्पुरत्या परवानग्या देतांना यात्रेदरम्यान विषबाधा तसेच अवैध वाहतूक होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी.असे त्यांनी संगितले.
यावेळी जितेंद्र महाराज व सुनिल महाराज यांनी यात्रेच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणी मांडून त्यावर उपाययोजना करण्यात याव्यात.अशी अपेक्षा व्यक्त केली.
0 Response to "पोहरादेवी यात्रेच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा"
Post a Comment