उद्याच रुजू व्हा, नाहीतर बडतर्फ व्हाल! ठाकरे सरकारचा ST कर्मचाऱ्यांना शेवटचा इशारा
साप्ताहिक सागर आदित्य/
उद्याच रुजू व्हा, नाहीतर बडतर्फ व्हाल! ११ हजार नव्या भरतीचं टेंडर तयार, ठाकरे सरकारचा ST कर्मचाऱ्यांना शेवटचा इशारा
एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण करण्याची मागणी लावून धरलेल्या महामंडळाच्या संपकरी कर्मचाऱ्यांना ठाकरे सरकारनं निर्वाणीचा इशारा दिला आहे.
एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण करण्याची मागणी लावून धरलेल्या महामंडळाच्या संपकरी कर्मचाऱ्यांना ठाकरे सरकारनं निर्वाणीचा इशारा दिला आहे. संपकरी कर्मचाऱ्यांनी उद्याच कामावर रुजू व्हावं नाहीतर कायदेशीररित्या कारवाई करुन बडतर्फ करण्यात येईल, असा स्पष्ट शब्दांत इशारा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना दिला आहे. यावेळी त्यांनी आमचं ११ हजार नवे कंत्राटी एसटी चालक आणि कंडक्टर भरती करण्यासाठीचं टेंडर देखील तयार असल्याचं म्हटलं आहे. कर्मचारी ऐकले नाहीत तर लवकरच टेंडर जारी केलं जाईल, असा इशारा मंत्री परब यांनी दिला आहे. ते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. मुंबईत आज राज्यमंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या विषयावरही चर्चा झाली. राज्य सरकारनं आता संपकरी एसटी कर्मचाऱ्यांविरोधात कायदेशीररित्या कारवाई करण्याचा निर्णय घेतला असल्याचं परब यांनी सांगितलं. "संपकरी कर्मचाऱ्यांवर उद्यापासूनच कारवाई सुरू करण्यात येणार आहे. कारण आतापर्यंत ७ वेळा कामावर रुजू होण्याचं आवाहन कर्मचाऱ्यांना करण्यात आलं आहे. परंतु असा समज झालाय की प्रशासन फक्त कारवाईचा इशारा देतंय. त्यामुळे आता आमची जी काही कारवाई आहे ती चालू होईल. जे उद्यापासून कामावर येत नाहीत. त्यांना नोकरीची गरज नाही असं आमचं मत झालेलं आहे. ते शिक्षेस पात्र आहेत. कारवाई काही दिवस थांबली होती. पण उद्यापासून कारवाईला सुरुवात होईल", असं अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे.
११ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करणार"संपकरी कर्मचारी जर उद्यापासून कामावर रुजू झाले नाहीत. तर आमचा दुसरा पर्याय देखील तयार आहे. परिवहन विभागाकडून लवकरच ११ हजार कंत्राटी चालक आणि कंडक्टरच्या भरतीचं टेंडर जारी केलं जाणार आहे", अशी माहिती अनिल परब यांनी यावेळी दिली. राज्यातील एसटीची सेवा सुरळीत ठेवण्यासाठी लवकरच कर्मचारी भरतीचं नवं टेंडर काढलं जाईल, असं ते म्हणाले.
0 Response to "उद्याच रुजू व्हा, नाहीतर बडतर्फ व्हाल! ठाकरे सरकारचा ST कर्मचाऱ्यांना शेवटचा इशारा"
Post a Comment