सफाई कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा
साप्ताहिक सागर आदित्य
सफाई कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा
राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य रवी रामु कलोसे यांचे निर्देश
आरोग्य, सुरक्षा,निवास, व प्रलंबित लाभांचा घेतला आढावा
वाशिम, : सफाई कर्मचाऱ्यांचे सामाजिक व आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. त्यांना सन्मानजनक वागणूक देऊन त्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात, असे निर्देश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य रवी रामु कलोसे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात आयोजित आढावा बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाच्या सुविधा, आरोग्य व सुरक्षा, वेतन, पदोन्नती, सेवानिवृत्ती लाभ आणि विविध कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा कलोसे यांनी घेतला. यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर , अपर पोलीस अधीक्षक लता फड, आणि नगरपालिका सहआयुक्त डॉ. बाबुराव बिक्कड उपस्थित होते.
श्री कलोसे म्हणाले,जिल्ह्यातील नगरपालिका व नगर पंचायतींमध्ये एकूण १ हजार २५ सफाई कर्मचाऱ्यांची नोंद असून, त्यामध्ये स्थायी, अस्थायी व कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व सुरक्षेसाठी नमस्ते योजनेंतर्गत आरोग्य तपासणी शिबिरे, जनजागृती कार्यशाळा, प्रशिक्षण, पीपीई किट वाटप तसेच आयुष्मान कार्ड नोंदणी उपक्रम राबवावेत. सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा किटचे वितरण करून कामाच्या ठिकाणी सुरक्षा उपकरणांचा नियमित वापर सुनिश्चित करावा. आपत्कालीन प्रतिसाद स्वच्छता युनिट स्थापन करावे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायदा तसेच असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा कायदा, २००८ नुसार वेतन मिळेल, याची खात्री करण्यासाठी कंत्राटदारांना सूचना द्याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.
शैक्षणिक पात्रतेनुसार सफाई कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याबाबत शासन निर्णयानुसार कार्यवाही करावी. लाड-पागे समितीच्या शिफारशींनुसार वारस नियुक्ती तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वारसांना सेवेत सामावून घेण्याच्या धोरणानुसार कार्यवाही करावी. सेवानिवृत्ती लाभांचे वितरण विहित कालमर्यादेत करून कोणताही लाभ प्रलंबित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. सफाई कर्मचाऱ्यांना दुसरा व चौथा शनिवार सुटी देण्याबाबतही कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.
सफाई कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने, घरांचे मालकी हक्क हस्तांतरण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरांची उपलब्धता, सेवा पुस्तिका अद्ययावत ठेवणे आणि सुधारित आश्वासित प्रगती योजना अंतर्गत लाभ देण्याबाबतही आढावा घेतला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेंतर्गत पात्र कर्मचाऱ्यांच्या पात्रता याद्या तयार कराव्यात. घरकुलांसाठी आवश्यक जागेची पूर्तता करण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठराव घेऊन प्रस्ताव सादर करावेत. अतिक्रमण असलेल्या जागा नियमानुकूल करून घ्याव्यात तसेच घरकुलांसाठी जागा राखीव ठेवाव्यात, असे निर्देश कलोसे यांनी दिले.
पात्र कर्मचाऱ्यांना आयुष्मान कार्ड व नमस्ते कार्ड उपलब्ध करून देणे, नियमित आरोग्य तपासणी, आवश्यक प्रशिक्षण, निवासस्थानांचे स्ट्रक्चरल ऑडिट, प्रलंबित सेवा विषयक प्रकरणांचा निपटारा तसेच पदोन्नतीबाबत कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
सफाई कर्मचारी हे शहराच्या स्वच्छतेचे महत्त्वाचे आधारस्तंभ असून, त्यांना सुरक्षित कार्यपरिसर, समानतेची वागणूक आणि सन्मानाचे जीवन मिळणे आवश्यक आहे, असे कलोसे यांनी सांगितले. सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नगर परिषद व नगर पंचायत स्तरावर मुख्याधिकाऱ्यांच्या माध्यमातून नियमित समन्वय बैठका घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, असेही त्यांनी निर्देशित केले.
बैठकीला सर्व मुख्याधिकारी, यंत्रणा प्रमुखांसह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0 Response to "सफाई कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा"
Post a Comment