गोरक्षणात १५६ जनावरे असून, त्यांच्यासाठी पुढील सहा ते सात महिने पुरेल इतका चारा साठा उपलब्ध असल्याचे पाहणीत आढळून आले
साप्ताहिक सागर आदित्य
पशुसंवर्धन विभागाचा खुलासा
सहा ते सात महिन्यांचा चारा साठा उपलब्ध
जिल्ह्यात अद्याप चारा टंचाई नसल्याचे स्पष्टीकरण
वाशिम, : काही वृत्तवाहिनींवर २२ नोव्हेंबर रोजी श्री दिलीपबाबा गोरक्षण, वाशिम येथील परिस्थितीबाबत प्रसारित झालेल्या बातमीच्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. गोरक्षणात १५६ जनावरे असून, त्यांच्यासाठी पुढील सहा ते सात महिने पुरेल इतका चारा साठा उपलब्ध असल्याचे पाहणीत आढळून आले.
पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाने आज २४ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता श्री दिलीपबाबा गोरक्षणाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी राष्ट्रीय डिजिटल पशुधन अभियान प्रणालीवरील नोंदीनुसार नोंदणीनुसार गोरक्षणात एकूण १५६ जनावरे असल्याचे निदर्शनास आले. जिल्ह्यात नोंदणीकृत २३ गोशाळेत जनावरांसाठी सोयाबीनचे कुटार तसेच सुके गवत मुबलक प्रमाणात साठवून ठेवण्यात आले आहे. हा चारा साठा पुढील सहा ते सात महिने पुरेल इतका असल्याची माहिती देण्यात आली. तसेच गोरक्षणाकडे उपलब्ध असलेल्या जमिनीवर ठोंबाची लागवड करण्यात आली आहे.
सदर गोरक्षणाला यापूर्वी गोसेवा आयोगाकडून तीन महिन्यांचे अनुदान प्राप्त झाले आहे. तसेच पुढील सहा महिन्यांच्या अनुदानासाठी ९ लाख ४७ हजार ३५० रुपयांचा प्रस्ताव गोसेवा आयोगाकडे सादर करण्यात आला आहे.
दरम्यान, वाशिम जिल्ह्यात पुढील मे महिन्यापर्यंत पुरेल इतका चारा उपलब्ध असून, सद्यस्थितीत जिल्ह्यात चारा टंचाईची परिस्थिती नसल्याचे जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय यांनी खुलास्याव्दारे स्पष्टीकरण दिले आहे.
0 Response to "गोरक्षणात १५६ जनावरे असून, त्यांच्यासाठी पुढील सहा ते सात महिने पुरेल इतका चारा साठा उपलब्ध असल्याचे पाहणीत आढळून आले"
Post a Comment