दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा! जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
साप्ताहिक सागर आदित्य
दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा!
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
📍 जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समिती सभा
दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर, पशुधन आणि नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. संबंधित विभागांनी प्रलंबित अनुपालन अहवाल तातडीने सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील काटेपूर्णा सभागृहात २१ ऑक्टोबर रोजी झालेल्या जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीच्या सभेत विविध उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांच्यासह संबंधित यंत्रणाप्रमुख उपस्थित होते.
🌱 शेतकरी हिताच्या उपाययोजनांवर भर
शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जवसुलीस स्थगिती आणि कृषिपंपांच्या वीजबिलात सवलत देण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. रोजगार हमी योजनेतून अधिकाधिक सार्वजनिक कामे सुरू करून मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याचेही निर्देश देण्यात आले.
💧 पाणीटंचाई निवारणासाठी नियोजन
संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन जिल्ह्याचा पाणीटंचाई आराखडा तातडीने सादर करण्यास सांगण्यात आले. गरज भासल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठा, पिण्याचे पाणी आणि पशुधनासाठी पाण्याचे नियोजन करण्यावर भर देण्यात आला.
🌾 चारा उपलब्धता आणि जलसंधारण
रब्बी हंगामासाठी चारा उत्पादन वाढविणे, वैरण बियाणे उपलब्ध करून देणे तसेच चारा संकलन, साठवणूक, वाहतूक व वितरणाचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जलसंधारणाची कामे, पाणी आरक्षणाचे प्रस्ताव आणि उपलब्ध जलसाठ्याबाबतही आढावा घेण्यात आला.
याशिवाय विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कमाफी, शेतकरी व शेतमजुरांना अन्नधान्याची उपलब्धता आणि टंचाईग्रस्त गावांतील कृषिपंपांची वीजजोडणी खंडित न करण्यासंदर्भातील उपाययोजनांचाही आढावा घेण्यात आला. सर्व संबंधित विभागांनी शासनाच्या निर्देशांनुसार कार्यवाही करून अद्ययावत अहवाल सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
#Washim #DroughtManagement #दुष्काळनिवारण #जिल्हा_प्रशासन #शेतकरीहित #जलसंधारण #जिमाका_वाशिम
0 Response to "दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा! जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर"
Post a Comment