-->

जिल्हास्तरीय चारा टंचाई व्यवस्थापनाचा आढावा सभा

जिल्हास्तरीय चारा टंचाई व्यवस्थापनाचा आढावा सभा



 साप्ताहिक सागर आदित्य 

 चारा लागवड मोहीम प्रभावीपणे राबवा

जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर


▪️ जिल्हास्तरीय चारा टंचाई व्यवस्थापनाचा आढावा सभा


वाशिम,  : संभाव्य ‘एल-निनो’ प्रभावाच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर २०२६ ते जून २०२७ या कालावधीत उद्भवू शकणाऱ्या चारा टंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यात ‘विकसित भारत – रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण)’ अंतर्गत विशेष चारा लागवड मोहीम प्रभावीपणे राबवावी. ही मोहीम पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व संबंधित विभागांनी नियोजनबद्ध कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.


जिल्हाधिकारी कार्यालयातील काटेपूर्णा दालनात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चारा लागवड मोहीम आणि जिल्हास्तरीय चारा टंचाई व्यवस्थापनाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.


यावेळी बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, रोहयो उपजिल्हाधिकारी विरेंद्र जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाहा, पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. तुषार बावणे, सहाय्यक वनसंरक्षक सुशील मंतावार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


📋 चारा ताळेबंद तयार करून टंचाईप्रवण गावांची निश्चिती


पशुसंवर्धन व कृषी विभागाने अद्ययावत पशुगणनेच्या आधारे मोठ्या व लहान जनावरांची संख्या विचारात घेऊन दररोज आणि दरमहा आवश्यक असलेल्या चाऱ्याचे प्रमाण निश्चित करावे. खरीप व रब्बी हंगामातील पीकनिहाय क्षेत्राच्या आधारे कडबा, कुटार आणि भुसा यांसारख्या वैरणीची उपलब्धता मोजून चारा ताळेबंद तयार करावा. त्यानुसार संभाव्य चारा टंचाईप्रवण गावांची यादी तातडीने अंतिम करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.


🌱 गायरान, गाळपेर व वैयक्तिक जमिनीवर चारा लागवड


चारा उपलब्धता वाढविण्यासाठी अतिक्रमणमुक्त गायरान जमीन, धरण व तलाव परिसरातील गाळपेर जमीन तसेच वैयक्तिक लाभार्थ्यांच्या जमिनीवर चारा पिकांची लागवड करण्यात येणार आहे. वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक, अनुसूचित जाती-जमातीतील व्यक्ती, महिला-प्रधान कुटुंबे आणि पशुपालक कुटुंबांना प्राधान्य द्यावे. स्थानिक हवामानात तग धरणाऱ्या आणि जनावरांसाठी वैरण म्हणून उपयुक्त असलेल्या वृक्षांची तसेच बहुवर्षीय गवतांची लागवड तांत्रिक मार्गदर्शक सूचनांनुसार करण्याचे नियोजन करावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.


📅 कामांना मुदतीत सुरुवात करण्याचे निर्देश


चारा लागवडीचे नियोजन २० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे. पाण्याच्या उपलब्धतेनुसार लागवडीची ठिकाणे २५ ऑक्टोबरपर्यंत निश्चित करावीत. वैरण बियाणे व गवताच्या ठोंब्यांची उपलब्धता ३० ऑक्टोबरपर्यंत निश्चित करावी. ग्रामसभेचे ठराव घेऊन कामांचा ग्रामपंचायत विकास आराखड्यात समावेश करणे आणि युक्तधारा प्रणालीवर नोंदणी करण्याची कार्यवाही ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी. प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देऊन प्रत्यक्ष कामांना तात्काळ सुरुवात करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी दिले.


सर्व तहसीलदार, सर्व पशुधन विकास अधिकारी व्हीसीद्वारे सहभागी झाले होते.


0000

 #चारालागवड #चाराटंचाई #पशुसंवर्धन #कृषीविभाग #एलनिनो #दुष्काळ

0 Response to "जिल्हास्तरीय चारा टंचाई व्यवस्थापनाचा आढावा सभा"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article