-->

खरीप हंगाम २०२६ मधील दुष्काळी परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे आंतरमंत्रालयीन पथक

खरीप हंगाम २०२६ मधील दुष्काळी परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे आंतरमंत्रालयीन पथक

 


साप्ताहिक सागर आदित्य 

खरीप हंगाम २०२६ मधील दुष्काळी परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे आंतरमंत्रालयीन पथक 

महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहे. ११ ऑक्टोबरपर्यंतच्या या दौऱ्यात राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार असून, पाऊस, पीक नुकसान, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि जनावरांच्या चाऱ्याच्या स्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. यासाठी विविध पथके तयार करुन जास्तीत जास्त क्षेत्राचा आढावा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या पाहणीदरम्यान स्थानिक अधिकारी, तज्ज्ञ आणि राज्य शासनाचे संबंधित अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.


केंद्राच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव मुक्तानंद अग्रवाल हे या पथकाचे प्रमुख आहेत. केंद्र शासनाच्या कृषी, जलसंपदा, ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, अन्न व सार्वजनिक वितरण, पशुसंवर्धन, अर्थ विभाग, नीती आयोग आणि अन्य संबंधित विभागांतील प्रशासकीय आणि तांत्रिक अधिकाऱ्यांचा पथकात समावेश आहे.


केंद्रीय पथकाच्या मुंबईतील आगमनानंतर सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी यावेळी पावसाच्या कमतरतेमुळे महाराष्ट्रातील काही भागांत निर्माण झालेली पाणीटंचाई, टँकर्सची संभाव्य गरज, शेतीवर अवलंबून असलेले शेतमजूर व जमीनधारकांचे प्रश्न, मजुरांची स्थलांतराची शक्यता आणि शेतकरी आत्महत्या या बाबींकडे केंद्रीय पथकाचे लक्ष वेधले.


राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने अपर मुख्य सचिव विनिता वेद-सिंगल यांनी राज्यातील पावसाची स्थिती, अल निनोमुळे हवामान आणि पावसावर झालेले परिणाम तसेच शेतीपिकांच्या नुकसानीची सविस्तर आणि तांत्रिक माहिती दिली. पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेबाबतही सविस्तर आढावा सादर करण्यात आला.


कृषी, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा, भूजल सर्वेक्षण, जलसंपदा, जलसंधारण, रोजगार हमी योजना, ऊर्जा विभागाच्या वतीने सद्यस्थितीचा आढावा सादर करुन आगामी सात महिन्यातील संभाव्य परिस्थितीची माहिती दिली. यावेळी लघुपाटबंधारे तलाव (एमआय टँक), गावांमधील पाण्याचे स्रोत आणि त्यांची सद्यस्थिती याबाबतही केंद्रीय पथकाला माहिती देण्यात आली.


बैठकीस महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, ग्रामविकास विभागाचे सचिव डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज यांच्यासह केंद्रीय पथकातील सदस्य आणि राज्यातील संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


#दुष्काळ 

#शेतकरी

0 Response to "खरीप हंगाम २०२६ मधील दुष्काळी परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे आंतरमंत्रालयीन पथक "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article