आधार’ बायोमेट्रिक अपडेट करणे अनिवार्य; विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य सुविधा
साप्ताहिक सागर आदित्य
📢 ‘आधार’ बायोमेट्रिक अपडेट करणे अनिवार्य; विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य सुविधा
👦👧 ५ ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांना आधार अद्ययावतीकरण आवश्यक
🏛️ जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
📍 वाशिम,
आधारमधील बायोमेट्रिक रेकॉर्ड अद्ययावत ठेवण्यासाठी आणि विविध सरकारी योजना, शिष्यवृत्तीचे लाभ मिळवताना तसेच प्रवेश परीक्षांसाठी अर्ज करताना बायोमेट्रिक पडताळणीत येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी ५ ते १७ वयोगटातील मुलांचे सक्तीचे बायोमेट्रिक अपडेट आवश्यक आहे. या वयोगटातील मुलांसाठी ही सुविधा ३० सप्टेंबर २०२७ पर्यंत विनामूल्य असून, सर्व विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक रेकॉर्ड अद्ययावत करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.
आधार पोर्टलनुसार, सध्या महाराष्ट्रात सुमारे ४३.१६ लाख आणि गोव्यात सुमारे ६७,५०० मुलांचे बायोमेट्रिक अपडेट प्रलंबित आहे. त्यामुळे ५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ही बायोमेट्रिक अपडेटची सुविधा ३० सप्टेंबर २०२७ पर्यंत पूर्णपणे मोफत करण्यात आली आहे.
मुलाचे, मुलीचे वय ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पहिले मॅंडेटरी बायोमेट्रिक अपडेट म्हणजेच एमबीयू करणे आवश्यक असते. त्यानंतर वयाची १५ वर्षे पूर्ण झाल्यावर पुन्हा बायोमेट्रिक माहिती अपडेट करावी लागते. या दोन्ही टप्प्यांवर एमबीयू वेळेत पूर्ण करणे पालकांसाठी महत्त्वाचे आहे. यामध्ये वाढत्या वयानुसार मुलांचे हातांचे ठसे, डोळ्यांचे स्कॅन आणि नवीन छायाचित्र आधारमध्ये नोंदविले जाते. एमबीयू वेळेत न केल्यास आधारशी संबंधित विविध सेवांमध्ये अडचणी निर्माण होऊन आधार कार्ड रद्द देखील केले जाऊ शकते, त्यामुळे ५ ते १७ वयोगटातील मुलांचे आधार कार्ड त्वरीत अपडेट करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.
लहान मुलांसाठी आधार क्रमांक अतिशय महत्वाचा असून शाळेत प्रवेश, शिष्यवृत्ती, शाळेतील नोंदणी, तसेच विविध योजनांचा लाभ घेताना आधारचा वापर होत असल्याने पालकांनी आपल्या मुलाचे आधार कार्ड काढण्याबरोबरच वेळोवेळी त्यातील माहिती अपडेट ठेवून आधारचे वेळोवेळी अद्ययावतीकरण करणे गरजेचे आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याचे आधार एमबीयू. मुलांच्या भविष्यातील शैक्षणिक व शासकीय कामकाजात अडथळे येऊ नयेत, यासाठी वेळीच दक्षता घेऊन एमबीयू पूर्ण करावे.
जिल्हातील एकूण एमबीयू पूर्ण करण्याचे नियोजन शाळेतच विशेष शिबिराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. याचा लाभ घेऊन पालकांनी आपल्या मुलांचे एमबीयू पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांनी केले आहे. तसेच यानंतरही एमबीयू प्रलंबित असल्यास जवळच्या अधिकृत आधार केंद्रावर जाऊन प्रक्रिया पूर्ण करता येईल.
पालकांनी आपल्या मुलाच्या आधारची सद्यस्थिती अधिकृत आधार सेवांद्वारे तपासावी. एमबीयू प्रलंबित असल्यास संबंधित आधार केंद्रावर जाऊन अपडेटची आवश्यकता आहे का, याची खात्री करता येते. आधार क्रमांकाची स्थिती तपासल्यानंतर आवश्यक असल्यास तातडीने एमबीयू पूर्ण करावे. एमबीयू वेळेत न केल्यास आधारशी संबंधित सेवांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. आधारची स्थिती आणि एमबीयूची आवश्यकता पालकांनी वेळोवेळी तपासणे गरजेचे आहे. मुलाच्या आधारचा वापर करण्यापूर्वी त्याची स्थिती सक्रिय आहे की नाही, याची खात्री करावी, असेही जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
#आधार #बायोमेट्रिकअपडेट #एमबीयू #विद्यार्थी #शिष्यवृत्ती #शिक्षण #आधारअद्ययावतीकरण #वाशिम #जिल्हाप्रशासन #Aadhaar
0 Response to "आधार’ बायोमेट्रिक अपडेट करणे अनिवार्य; विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य सुविधा"
Post a Comment