सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे प्रशासक म्हणून आपली जबाबदारी वाढली
साप्ताहिक सागर आदित्य
सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे प्रशासक म्हणून आपली जबाबदारी वाढली
आहे. त्यामुळे प्रशासक म्हणुन काम करताना जशी आव्हाने आहेत तसेच ही एक संधी पण आहे. सर्वांनी हे आव्हान स्वीकारून या संधीचं सोनं करावं असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे यांनी केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांच्या निर्देशानुसार सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या वतीने वसंतराव नाईक सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ग्राम पंचायतचे प्रशासक म्हणून पदभार स्वीकारलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना या कार्यशाळेला आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी बोंद्रे यांनी वरील उद्गार काढले.
पुढे बोलताना ते म्हणाले "सध्या दुष्काळी परिस्थिती आहे आणि लोकांना दुष्काळ सुसह्य व्हावा यासाठी प्रशासकांनी प्रयत्न करावे. विनाकारण कोणाची कामे अडवू नये तसेच कोणतेही काम नियमात असेल तर ते करताना घाबरू नका." असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या वतीने सरपंच पदाच्या निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातील 196 ग्रामपंचायतीत एकुण 99 अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणुन नियुक्ती करण्यात आली. त्यांना अधिक माहिती देण्यासाठी या जिल्हा परिषदेच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
----------------------
Box:
गावातील शाळेमुळे आपण साहेब झालो!
आपण समाजाचे काहीतरी देणं लागतं या भावनेतून काम करण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे यांनी केले. यावेळी त्यांनी शाळेचे उदाहरण दिले. ते म्हणाले 'आपल्याकडे 60-70 च्या दशकात गावात शाळा नव्हत्या. तेव्हा कोणीतरी समाज सुधारक पुढे आले. त्यांनी शाळा सुरू केली. सुरुवातीला झाडाखाली किंवा कोणाच्या तरी पडक्या वाड्यात शाळा भरू लागली. नंतर शाळा पत्राच्या शेड खाली आणि नंतर सुरक्षित भिंतिच्या आत आणि छताखाली आली. परंतु सुरुवातीची झाडाखाली भरणारी शाळा नसती तर तुम्ही आम्ही शिकलो असतो का आणि साहेब झालो असतो का? कसा भावनिक प्रश्न विचारून त्यांनी समाजाचं काहीतरी देणं लागतं या भावनेतून प्रशासक म्हणून गावाचा विकास करण्याचे आवाहनही शेवटी त्यांनी केले.
-----------------------
कार्यशाळेत "प्रशासक नियुक्ती- अधिकार व कर्तव्य" या विषयावर विस्तार अधिकारी प्रमोद लोखंडे यांनी मार्गदर्शन केले. सहाय्यक गट विकास अधिकारी विजय खिल्लारे यांनी "प्रशासक म्हणून प्रत्यक्ष काम करताना येणाऱ्या अडचणी आणि ग्रामपंचायत अधिनियम" याबद्दल सविस्तर माहिती दिली. "मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान" याबाबत प्रवीण प्रशिक्षक मोहन भुसारी यांनी सादरीकरण केले. "घनकचरा व्यवस्थापन नियम 2026" या विषयावर राम श्रृंगारे यांनी पावर पॉईट प्रझेंटेशनच्या आधारे मांडणी केली. प्रवीण प्रशिक्षक शामलाल बरेटिया यांनी “महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959” मधील महत्त्वाच्या बाबींचा उलगडा केला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सहाय्यक गटविकास अधिकारी गजानन खुळे यांनी केले. क्षमता बांधणी तज्ञ प्रफुल्ल काळे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले आणि ग्रामपंचायत अधिकारी रामभाऊ देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले. अधिक्षक अमोल कापसे, अर्चना इंगोले आणि अथर्व शेटे यांनी कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
------------------
0 Response to "सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे प्रशासक म्हणून आपली जबाबदारी वाढली "
Post a Comment