सर्व विभागांनी सक्रिय सहभागी होऊन ‘सेवा संकल्प अभियान’ अमरावती विभागात यशस्वी करावे - विभागीय आयुक्त नयना गुंडे
साप्ताहिक सागर आदित्य
सर्व विभागांनी सक्रिय सहभागी होऊन ‘सेवा संकल्प अभियान’
अमरावती विभागात यशस्वी करावे - विभागीय आयुक्त नयना गुंडे
Ø १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर पर्यंत सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन
Ø समन्वय समितीची बैठक संपन्न
अमरावती दि. १६ : सामान्य नागरिकांपर्यंत सेवा पोहचविण्याच्या उद्देशाने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत अमरावती विभागातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगर पालिकांचे आयुक्त यांच्या बरोबरच सर्व विभागांच्या विभागीय, जिल्हा व तालुका स्तरीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभागी होऊन अमरावती विभागात ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वी करावे असे आवाहन अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी केले.
शासन निर्णयानुसार ‘सेवा संकल्प अभियानाच्या’ अंमलबजावणीसाठी अमरावती विभाग स्तरावर विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली अंमलबजावणी व सनियंत्रण समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या बैठकीत विभागीय आयुक्त गुंडे बोलत होत्या समितीचे सदस्य विभागातील जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर (अमरावती) श्रीमती वर्षा मिना (अकोला) प्रविण देवरे (बुलडाणा) विकास मिना (यवतमाळ) योगेश कुंभेजकर (वाशिम) जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी (अमरावती) नयन नावंदर (अकोला) गुलाबराव खरात (बुलडाणा) विशाल खत्री (यवतमाळ) अर्पित चव्हाण (वाशिम) महानगरपालिकांचे आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले (अमरावती) सुनिल लहाने (अकोला) या बैठकीस दुरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच समितीचे सदस्य सचिव माहिती उपसंचालक अनिल आलुरकर, महसुलचे अप्पर आयुक्त अनिल खंडागळे, विकास योजनेच्या अप्पर आयुक्त शालिनी कडू, नगरपालिका प्रशासनाचे सह आयुक्त नितिन कापडनिस, विकास योजना सहायक आयुक्त राजु फडके, उपायुक्त प्रविण मानकर आदि उपस्थित होते.
सेवा संकल्प अभियानाअंतर्गत विविध विभागांनी विविध उपक्रम राबविण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करुन विभागीय आयुक्त नयना गुंडे म्हणाल्या की, या अभियानात महसुल, ग्रामविकास, शिक्षण, नगरविकास, पाणीपुरवठा, आरोग्य, वन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता, माहिती व जनसंपर्क, महिला व बालविकास, सामाजिक न्याय, उच्च व तंत्रशिक्षण, उद्योग, आदिवासी विकास, दिव्यांग कल्याण इत्यादी विभागांनी आपापल्या योजनांची उपक्रमांची अंमलबजावणी करुन लाभार्थ्यांना अभियान कालावधीत प्राधान्याने लाभ घ्यायचा आहे. शासनाने ठरवून दिलेल्या उपक्रमांचे यशस्वी पध्दतीने आयोजन करुन “सेवा परमोधर्म” या उक्तीप्रमाणे सामान्य नागरिकांपर्यंत सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने अविरत प्रयत्न केला पाहिजे. या अभियान अंतर्गत सेवा सेतू अभियान, इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन, सेवा माझे योगदान, विकसित भारत संकल्प यात्रा, सेवाज्योत यात्रा, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, अंगणवाडी उत्सव, आर्शीवादाचा दिवा, बदलाची गोष्ट, आभार आणि संकल्पाची रांगोळी, नमो सेवागाथा, जल, जन आणि सेवा संकल्प यात्रा, जनसेवक महाकुंभ यासारखे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी व जिल्हा स्तरीय अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागाचे सुक्ष्म नियोजन करावे. आणि इतर घटकांप्रमाणेच कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करावे. गोरगरीब जनतेला, लाभार्थ्यांना विविध लोकोपयोगी सेवांचा लाभ देवून उपकृत करावे. प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा करणे, जिवंत सातबारा मोहिम, बळीराजा शेत व पाणंद रस्ते उपलब्ध करणे, शिधापत्रिकांचे वितरण, विविध प्रमाणपत्रांचे वितरण, जन्म मृत्यू नोंदणी, दिव्यांग प्रमाणपत्रे, शिकाऊ वाहक चालक परवाना, सातबारा व ८ अ च्या नोंदी अद्ययावत करणे इत्यादी कार्यक्रम राबविण्याचे यावेळी सुचित केले.
पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत कार्यक्रम आयोजित करुन रोजगार उपलब्ध करुन देण्याबाबत सुचित करुन आयुक्त म्हणाल्या की, सिंधी समाजाच्या लाभार्थ्यांना पट्टे वाटप करणे, पारधी बेड्यावर जाऊन त्यांच्या समस्या सोडविणे, तलाठी कार्यालयासाठी जागा शोधणे, स्मशानभूमीसाठी गाव पातळीवर जागा उपलब्ध करुन देणे, वनहक्क दावे निकाली काढणे अशा विविध उपक्रमाच्या माध्यमातून सेवा संकल्प अभियान राबविण्याबाबत विभागीय आयुक्त यांनी या बैठकीत मार्गदर्शन केले. या बैठकीनंतर महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दुरदृष्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन सेवा संकल्प अभियानाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी विविध विभागाचे प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.
0 Response to "सर्व विभागांनी सक्रिय सहभागी होऊन ‘सेवा संकल्प अभियान’ अमरावती विभागात यशस्वी करावे - विभागीय आयुक्त नयना गुंडे"
Post a Comment