भारत प्राथमिक मराठी शाळेत श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात
साप्ताहिक सागर आदित्य
भारत प्राथमिक मराठी शाळेत श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात
रिसोड : येथील भारत प्राथमिक मराठी शाळेत श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी शिशुवर्ग व पूर्वप्राथमिक वर्गातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी राधा, कृष्ण व गवळणी यांच्या आकर्षक वेशभूषेत सहभागी होत श्रीकृष्णाच्या बाललीलांवर आधारित विविध नृत्यांचे सादरीकरण केले.
त्यानंतर शाळेच्या मैदानात बालगोपाळांसाठी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. ‘गोविंदा आला रे, गोपाळ आला’ अशा जयघोषात चिमुकल्या गोविंदांनी दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना गोपाळकाल्याचा पारंपरिक प्रसाद व खाऊचे वाटप करण्यात आले.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीतील सण-उत्सवांची ओळख करून देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्याध्यापिका सौ. किरणताई दुबे म्हणाल्या, 'शालेय सांस्कृतिक कार्यक्रमांतून भारतीय सांस्कृतिक वारसा जपण्यास चालना मिळते. सांस्कृतिक उपक्रमाच्या माध्यमातून बंधुभाव, मैत्री, सहकार्याचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो.”
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता शिक्षक परमेश्वर देशमुख, गौरव पतंगे तसेच शिक्षिका संगीता दुपारते,सुनीता रासकर व प्रतिभा पांचवटकर यांचे सहकार्य लाभले.
0 Response to "भारत प्राथमिक मराठी शाळेत श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात"
Post a Comment