घनकचरा व्यवस्थापन नियम-२०२६’ ची प्रभावी अंमलबजावणीसाठी क्षमताबांधणी कार्यशाळा
साप्ताहिक सागर आदित्य
‘घनकचरा व्यवस्थापन नियम-२०२६’ ची प्रभावी अंमलबजावणीसाठी क्षमताबांधणी कार्यशाळा
लोकांच्या मानसिकतेत बदल घडविण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा: जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
वाशिम, : घनकचरा व्यवस्थापन ही केवळ स्वच्छतेची बाब नसून सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणाशी निगडित अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. ‘घनकचरा व्यवस्थापन नियम-२०२६’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लोकांच्या मानसिकतेत बदल घडविणे आवश्यक असून, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
‘घनकचरा व्यवस्थापन नियम-२०२६ : गावस्तरावर अंमलबजावणी- संधी व आव्हाने’ या विषयावरील जिल्हास्तरीय क्षमता बांधणी कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता महेश कान्हेकर आणि जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गजानन खुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी कुंभेजकर म्हणाले की, “घनकचरा व्यवस्थापन नियम-२०२६च्या अनुषंगाने लोकांच्या मानसिकतेत बदल होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक ती कायदेशीर आयुधे उपलब्ध करून दिली असून, नियमांच्या अंमलबजावणीचे सक्त निर्देश दिले आहेत. त्यामुळे प्रत्येक जिल्हाधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.”
--------------------------------------------------
‘जे केले ते दाखवा’:
ग्रामपंचायतींनी केवळ घनकचरा व्यवस्थापनाची कामे केल्याचा दावा न करता, त्या कामांची दृश्य आणि डिजिटल स्वरूपात नोंद ठेवणे आवश्यक आहे. नव्या नियमांनुसार करण्यात आलेल्या कामांचे पूर्वीचे आणि नंतरचे जिओटॅग फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. यासाठी ‘स्वच्छतम्’ पोर्टल तयार करण्यात आले असून, त्यावर अचूक आणि अद्ययावत माहिती ऑनलाइन भरणे आवश्यक आहे, असेही जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी स्पष्ट केले.
घनकचरा व्यवस्थापन नियमांची अंमलबजावणी करण्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ग्रामपंचायतींची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. ग्रामपंचायतींनी आतापासूनच कचऱ्याचे वर्गीकरण, कचऱ्यावर प्रक्रिया आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा न करण्याच्या सवयी नागरिकांमध्ये रुजविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गजानन खुळे यांनी केले. पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेचे जनसंपर्क अधिकारी राम श्रृंगारे यांनी ‘घनकचरा व्यवस्थापन नियम-२०२६ : गावस्तरावर अंमलबजावणी- संधी व आव्हाने’ या विषयावर सादरीकरण केले.
क्षमता बांधणी तज्ज्ञ प्रफुल्ल काळे यांनी घनकचरा व्यवस्थापन नियमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी क्षमता बांधणी उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. मनुष्यबळ विकास सल्लागार शंकर आंबेकर यांनी घनकचरा व्यवस्थापनाच्या पर्यावरणीय पैलूंवर प्रकाश टाकला. यावेळी वाशिम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रविंद्र सोनवणे आणि पारवा ग्रामपंचायतीचे सरपंच गोपाल लुंगे यांनी मनोगत व्यक्त केले.
जिल्ह्यातील बाजारपेठा तसेच मोठी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींचे सरपंच, नोडल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, विस्तार अधिकारी तसेच सर्व गटविकास अधिकारी यांना कार्यशाळेसाठी आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रफुल्ल काळे यांनी केले.
---------------------------------------------
अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेत:
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने ‘घनकचरा व्यवस्थापन नियम-२०२६’च्या अंमलबजावणीला अत्यावश्यक व अनिवार्य कामाचे स्वरूप दिले आहे. त्यामुळे या कामाकडे कोणत्याही शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्याला दुर्लक्ष करता येणार नाही. दरम्यान, जिल्हास्तरीय क्षमता बांधणी कार्यशाळेस काही कर्मचारी अनुपस्थित राहिल्याचे वरिष्ठांच्या निदर्शनास आले असून, संबंधित अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. याबाबत स्वतंत्र अधिकृत पत्र अद्याप निर्गमित झाले नसल्याची माहिती आहे.
------------------------------------------------
0 Response to "घनकचरा व्यवस्थापन नियम-२०२६’ ची प्रभावी अंमलबजावणीसाठी क्षमताबांधणी कार्यशाळा"
Post a Comment