मुलगा-मुलगी समान' हा विचार कृतीत उतरविण्यासाठी विधी स्वयंसेवक सज्ज!
साप्ताहिक सागर आदित्य
⚖️ 'मुलगा-मुलगी समान' हा विचार कृतीत उतरविण्यासाठी विधी स्वयंसेवक सज्ज! 👧👦
लिंग निवडीस प्रतिबंधासाठी समाजजागृतीत सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन
स्त्रीभ्रूणहत्या रोखणे, मुलगा-मुलगी समानतेची भावना दृढ करणे आणि पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वाशिम यांच्या वतीने विधी स्वयंसेवकांसाठी गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्रज्ञान (पीसीपीएनडीटी) (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनियम, १९९४ या विषयावरील प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही. जी. चौखंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या प्रशिक्षणात विधी स्वयंसेवकांना कायद्याच्या महत्त्वपूर्ण तरतुदी, त्याची प्रभावी अंमलबजावणी आणि समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्यातील त्यांची भूमिका याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सचिव व्ही. जी. चौखंडे यांनी समाजात मुलगा-मुलगी समानतेची भावना अधिक दृढ करण्यासाठी आणि स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याचे काटेकोर पालन होणे आवश्यक असल्याचे सांगितले. गावागावात जाऊन नागरिकांना कायद्याची अचूक माहिती देत लिंग निवडीस प्रतिबंधासाठी व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी विधी स्वयंसेवकांना केले.
प्रशिक्षक म्हणून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे कायदा तथा परिविक्षा अधिकारी जिनसाजी मदन चौधरी यांनी पीसीपीएनडीटी कायद्याची उद्दिष्टे, महत्त्वाच्या तरतुदी, वैद्यकीय संस्थांच्या जबाबदाऱ्या, कायद्याचे उल्लंघन झाल्यास होणारी कारवाई तसेच समाजाच्या सक्रिय सहभागाचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी उपस्थित स्वयंसेवकांच्या शंकांचे निरसन करत कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक बाबींवरही चर्चा केली.
समाजात 'कन्या हीच कुटुंबाची ताकद' हा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विधी स्वयंसेवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, प्रत्येक नागरिकाने लिंगभेदमुक्त समाज घडविण्यासाठी पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे.
#जिल्हाविधीसेवाप्राधिकरण #Washim #PCPNDT #बेटीबचाओ #मुलगामुलगीसमान #स्त्रीभ्रूणहत्यारोखा #विधीस्वयंसेवक #कायद्याचीजाण #महिलासक्षमीकरण #जनजागृती #वाशिम
0 Response to "मुलगा-मुलगी समान' हा विचार कृतीत उतरविण्यासाठी विधी स्वयंसेवक सज्ज! "
Post a Comment