वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे 'वृक्ष रक्षाबंधन' उत्साहात संपन्न
साप्ताहिक सागर आदित्य
वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे 'वृक्ष रक्षाबंधन' उत्साहात संपन्न
वृक्षांना राखी बांधून विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश!
मानोरा
स्थानिक वसंतराव नाईक विद्यालय, मानोरा येथे रक्षाबंधनाचा सण एका आगळ्यावेगळ्या आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यात आला. मानवी जीवनात वृक्षांचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व ओळखून शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व मुख्याध्यापक यांनी विद्यालयाच्या परिसरातील वृक्षांची विधिवत पूजा करून त्यांना राख्या बांधल्या आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला.
वाढते प्रदूषण आणि दिवसेंदिवस होणारा हवामान बदल लक्षात घेता, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावणे व त्यांचे संवर्धन करणे काळाची गरज बनली आहे. झाडे आपल्याला अविरतपणे प्राणवायू, सावली, फळे आणि फुले देऊन आपले रक्षण करतात; म्हणूनच या 'निसर्ग रक्षकां'प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यालयात हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला.
झाडे हीच आपली खरी जीवनरक्षक : मुख्याध्यापक प्रसेन भगत सर
याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रसेन भगत सर म्हणाले की, "ज्याप्रमाणे भाऊ-बहीण एकमेकांच्या रक्षणाचे वचन देतात, त्याचप्रमाणे मानवानेही निसर्गाचे आणि वृक्षांचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे. झाडे ही केवळ वनस्पती नसून आपली खरी जीवनरक्षक आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एका झाडाचे संगोपन करून निसर्गाप्रती आपली जबाबदारी पार पाडावी."
कार्यक्रमादरम्यान उपस्थित शिक्षकांनी व काही विद्यार्थ्यांनीही आपली मनोगते व्यक्त करून झाडांचे संवर्धन करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या अभिनव उपक्रमास मुख्याध्यापक प्रसेन भगत सर यांच्यासह राठोड सर, मार्गे सर, मोहसीन सर, उजवे सर, भगत सर, चातुरकर मॅडम, पारधी सर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. शाळेच्या या उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
0 Response to "वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे 'वृक्ष रक्षाबंधन' उत्साहात संपन्न"
Post a Comment