एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यान्वित असलेल्या सर्व सेवांचा
साप्ताहिक सागर आदित्य
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यान्वित असलेल्या सर्व सेवांचा व उपक्रमांचा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आढावा घेतला. राज्यातील अंगणवाडी केंद्रांमार्फत बालक, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये पोषण आहाराच्या गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगत पोषण आहाराची काटेकोर तपासणी व्हावी असे निर्देश त्यांनी दिले.
बालकांच्या पोषण आहाराची गुणवत्ता, योग्य स्थिती आणि लाभार्थ्यांना स्वीकारार्हता यामध्ये कोणतीही तडजोड होऊ नये. पुरवण्यात येणारा पोषण आहार सर्वोत्तम दर्जाचा असावा यासाठी संपूर्ण यंत्रणेने सतर्क व कार्यरत राहावे असे निर्देश मंत्री तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्तांनी भारतीय खाद्य निगम (FCI) प्रशासनाशी समन्वय साधून पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत अतिरिक्त काळजी घ्यावी. अंगणवाडी सेविकांनी पोषण आहार स्वीकारताना त्याची गुणवत्ता तपासूनच स्वीकारावा आणि प्राप्त झाल्यानंतर तातडीने लाभार्थ्यांना वितरित करावा. शिल्लक आहार कालबाह्य होण्यापूर्वी वितरित करावा. आहाराबाबत तक्रार असल्यास मुख्यसेविकेमार्फत प्रकल्प अधिकाऱ्यांना कळवावे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांनी तत्काळ अंगणवाडी केंद्रास भेट देऊन शहानिशा करावी, असे निर्देश मंत्री तटकरे यांनी दिले.
बैठकीस महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव, आयुक्त माधवी सरदेशमुख, सहसचिव वि. रा. ठाकूर, सहआयुक्त संगीता लोंढे यांच्यासह महिला व बाल विकास विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#पोषणआहार
#एकात्मिकबालविकाससेवायोजना
0 Response to "एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यान्वित असलेल्या सर्व सेवांचा "
Post a Comment