-->

विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण; गुणवंत विद्यार्थ्याला अध्यक्षस्थान  कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषि महाविद्यालय, (अहिंसातीर्थ) आमखेडा येथे

विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण; गुणवंत विद्यार्थ्याला अध्यक्षस्थान कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषि महाविद्यालय, (अहिंसातीर्थ) आमखेडा येथे

 


साप्ताहिक सागर आदित्य 

विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण; गुणवंत विद्यार्थ्याला अध्यक्षस्थान

कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषि महाविद्यालय, (अहिंसातीर्थ) आमखेडा येथे अभिनव उपक्रमातून स्वातंत्र्यदिन उत्साहात 


 कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषि महाविद्यालय, (अहिंसातीर्थ) आमखेडा येथे स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. संतोषराव बाबारावजी जोगदंड यांच्या संकल्पनेतून यावर्षी विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवत अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये प्राध्यापकांच्या हस्ते ध्वजपूजन, विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण तसेच महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्याला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान देण्यात आले.


महाविद्यालयातील प्रा. ए. डी. मानवतकर यांची विद्यार्थी उपस्थिती वाढविण्यासाठी केलेली उल्लेखनीय कामगिरी लक्षात घेऊन त्यांना ध्वजपूजनाचा मान देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच महाविद्यालयाच्या वसतिगृहाला ‘कृषि ग्राम छात्रालय’ हे नाव सुचविणाऱ्या विद्यार्थ्याचा विशेष सन्मान करण्याच्या उद्देशाने विद्यार्थी रोहन नांगरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

महाविद्यालयातून प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थी जीवन इंगोले यांना कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला, कल्पकतेला आणि नेतृत्वगुणांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताने संपूर्ण वातावरण देशभक्तीने भारावून गेले.

यावेळी ग्रामगीता जीवन विकास परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, मूल्यशिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि व्यक्तिमत्त्व विकासाची जाणीव निर्माण करण्याच्या दृष्टीने या परीक्षेत सहभागी होऊन यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.

यावेळी डॉ. संतोषराव बाबारावजी जोगदंड,  राजेश घुगे (अध्यक्ष, कृषि तंत्र विद्यालय, आमखेडा),  पांडुरंग जोगदंड, सुरेशकाका जोगदंड, घनश्याम जोगदंड, गजानन पाचरणे, शुभम जोगदंड, अजबराव बनसोड, मदनराव जोगदंड, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एम. क्षीरसागर, कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य प्रा. ए. पी. वाठोरे, ग्राम छात्रालयाचे अधीक्षक, गावातील पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना तसेच क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील स्मार्ट डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन करण्यात आले. तसेच रांगोळी स्पर्धा, विविध क्रीडा स्पर्धा, कबड्डी, क्रिकेट आणि बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या सर्व स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा. एस. टी. कव्हर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सार्थक भांडेकर व पंकज खाडे यांनी केले.

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, गुणवत्तेला आणि नेतृत्वगुणांना व्यासपीठ देत स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातून साजरा करण्याचा महाविद्यालयाचा हा अभिनव उपक्रम उपस्थितांकडून कौतुकास पात्र ठरला. ‘विद्यार्थी हेच केंद्रबिंदू’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक वातावरणात नव्या प्रेरणेची आणि उत्साहाची भर पडली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

0 Response to "विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण; गुणवंत विद्यार्थ्याला अध्यक्षस्थान कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषि महाविद्यालय, (अहिंसातीर्थ) आमखेडा येथे "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article