-->

वसंतराव नाईक विद्यालयात पालक सभा उत्साहात संपन्न

वसंतराव नाईक विद्यालयात पालक सभा उत्साहात संपन्न



 साप्ताहिक सागर आदित्य 

वसंतराव नाईक विद्यालयात पालक सभा उत्साहात संपन्न 


पालकांच्या उत्स्फूर्त सहभागाने शाळेचे वातावरण झाले सकारात्मक व प्रेरणादायी

मानोरा,  : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा देण्यासाठी आणि पालक-शिक्षक संवाद अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने वसंतराव नाईक विद्यालय, मानोरा येथे पालक सभेचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रसेन भगत सर होते. पालक प्रतिनिधी म्हणून बाजीराव साबळे उपस्थित होते. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शिवानंद मार्गे सर यांनी प्रभावीपणे केले. इंगोले मॅडम यांनी प्रास्ताविकातून पालक सभेची उद्दिष्टे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, शाळेतील विविध उपक्रम तसेच पालक-शिक्षक सहकार्याचे महत्त्व स्पष्ट केले.


यावेळी अनेक पालकांनी उत्स्फूर्तपणे आपली मते, सूचना व प्रतिक्रिया व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील प्रगती, शिस्त, उपस्थिती, शैक्षणिक गुणवत्ता तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत पालकांनी सकारात्मक विचार मांडले. पालकांनी शाळेमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक करत शाळेच्या प्रगतीसाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली.


मुख्याध्यापक प्रसेन भगत सर यांनी पालकांच्या सूचना व प्रतिक्रिया यांचे स्वागत करून, “विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळा आणि पालक यांच्यातील सुसंवाद व सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे प्रतिपादन केले. पालकांच्या सक्रिय सहभागामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीला निश्चितच अधिक बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


पालक प्रतिनिधी बाजीराव साबळे यांनीही शाळेच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक करून विद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पालकांचा नेहमीच सकारात्मक सहभाग राहील, असे सांगितले.


कार्यक्रमाच्या शेवटी विकलसिंग राठोड सर यांनी उपस्थित सर्व पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार मानले.


पालकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे, सकारात्मक संवादामुळे आणि विविध सूचनांच्या आदान-प्रदानामुळे ही पालक सभा अत्यंत प्रेरणादायी, फलदायी व संस्मरणीय ठरली. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळा आणि पालकांनी एकत्रितपणे पुढे जाण्याचा सकारात्मक संदेश या सभेतून मिळाला.

0 Response to "वसंतराव नाईक विद्यालयात पालक सभा उत्साहात संपन्न "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article