-->

भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा



 साप्ताहिक सागर आदित्य 

भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा 


समग्र व सर्वसमावेशक विकासाकडे जिल्ह्याची वाटचाल

   पालकमंत्री दत्तात्रय भरणे


वाशिम, दि. १५ ऑगस्ट  शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रगतीसाठी  केंद्र व राज्य शासन लोकहितकारी योजनांची व्यापक अंमलबजावणी करीत आहे. त्यामुळे देश व राज्याची समग्र व सर्वसमावेशक विकासाकडे वाटचाल होत आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज केले.


भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांनी

जिल्ह्यातील सर्व नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय समारंभात राष्ट्रध्वजारोहण पालकमंत्री श्री. भरणे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपविभागीय  अधिकारी वैशाली देवकर आदी उपस्थित होते.


 

भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या त्यागाचे स्मरण करून पालकमंत्री भरणे यांनी हुतात्मे व स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले.  त्याग, शौर्य, देशभक्ती आणि राष्ट्रसेवेची परंपरा पुढे नेण्याचे आवाहन त्यांनी केले.


५४ हजार १०२ पात्र शेतकऱ्यांचा कर्जमुक्ती योजनेत समावेश


पालकमंत्री भरणे म्हणाले की,

जिल्ह्यातील ५४ हजार १०२ पात्र शेतकऱ्यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत समावेश असून, आधार प्रमाणीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. एकही पात्र शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री भरणे यांनी दिली. सिंचनाची सुविधा वाढविणे, उत्पादन वाढविणे आणि शेतीचा खर्च कमी करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


कृषी यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून सुमारे अडीच हजार शेतकऱ्यांना जवळपास १८ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. ‘प्रति थेंब अधिक पीक’ योजनेत २ हजार ६ शेतकऱ्यांना ६ कोटी रुपयांचे सूक्ष्म सिंचन अनुदान देण्यात आले आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील १८९ गावांमध्ये काम सुरू असून, ९४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. ‘महाविस्तार’ आणि ‘महाकृषी’च्या माध्यमातून आधुनिक कृषी तंत्रज्ञान व कृषीविषयक सल्ला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.


कच्च्या मालावर प्रक्रिया करून मूल्यवर्धनावर भर


विदर्भाच्या विकासाच्या दृष्टीने वाशिम जिल्ह्याला मोठी क्षमता असल्याचे पालकमंत्री भरणे यांनी नमूद केले. कृषी, व्यापार, उद्योग आणि वाहतूक या चारही क्षेत्रांच्या विकासासाठी जिल्ह्याला मोठी संधी असून, सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा यांसारखी पिके आणि कृषीआधारित व्यवसाय ही जिल्ह्याची मोठी ताकद आहे. केवळ कच्च्या मालाचे उत्पादन न करता त्यावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करणे आणि तयार उत्पादने देश-विदेशातील बाजारपेठेत पोहोचविण्याच्या दिशेने पुढे जाण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.


आरोग्य, शिक्षण, रस्ते, वीज आणि पाणी सुविधांना प्राधान्य


वाशिम जिल्ह्याचा विकास केवळ शेतीपुरता मर्यादित न ठेवता आरोग्य, शिक्षण, रस्ते, वीज, पाणी, सामाजिक न्याय आणि रोजगार या सर्व क्षेत्रांचा समतोल विकास करण्याचा प्रयत्न असल्याचे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले. आरोग्य सुविधांसाठी सुमारे ८० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, शिक्षण क्षेत्रात १५ कोटी ६१ लाख रुपयांच्या निधीतून शाळांच्या इमारती, प्रयोगशाळा, डिजिटल सुविधा आणि इतर पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत.


ग्रामीण भागातील वीज विकासासाठी साडेबारा कोटी रुपये, तर ग्रामीण रस्ते व जिल्हा मार्गांच्या मजबुतीकरणासाठी ४६ कोटी ९१ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातूनही रस्त्यांची कामे सुरू आहेत.


पाणी हा जिल्ह्याच्या विकासातील अत्यंत महत्त्वाचा विषय असून, जलयुक्त शिवार अभियान आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून रिचार्ज शाफ्ट, जलसंधारण तसेच भूजल पातळी वाढविण्याची कामे सुरू आहेत. यामुळे भविष्यात ग्रामीण भागातील पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.


सामाजिक न्यायातून सर्वसमावेशक विकास


अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, स्वाधार योजनेचा लाभ तसेच भूमिहीन लाभार्थ्यांना जमीन उपलब्ध करून देण्याचे काम करण्यात आले आहे. महिला, विद्यार्थी, युवक आणि समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे पालकमंत्री भरणे यांनी स्पष्ट केले.


वाशिम जिल्ह्याचा विकास हा  शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक यांच्या प्रगतीशी जोडलेला आहे. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने काम करून जिल्ह्याला अधिक सक्षम, समृद्ध आणि विकसित करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व अधिक मजबूत करण्याची शपथ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.


स्वातंत्र्यलढ्याची आणि देशसेवेची प्रेरणा जपणाऱ्या शहीद सैनिकांच्या वीरपत्नी शांताबाई यशवंत सरकटे, पार्वताबाई दगडू लहाने, मीराबाई योगराज नागुलकर आणि साधनाताई जनार्दन खेडकर तसेच आणीबाणीधारक शंकर कोकास, सुरेश माहुले, दिलीप टिकले, मदन येवले आणि डॉ. वसंतराव गायकवाड यांचा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते यावेळी सन्मान करण्यात आला.


महास्ट्राईड प्रकल्पात वाशिम जिल्ह्याचा राज्यात चौथा क्रमांक


जागतिक बँक सहाय्यित नियोजन विभागाच्या महास्ट्राईड प्रकल्पांतर्गत जिल्हा विकास आराखड्याच्या यशस्वी अंमलबजावणीत वाशिम जिल्ह्याने राज्यात चौथा क्रमांक मिळविला आहे. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या पुढाकाराने व सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे जिल्ह्याला १६ कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी मिळाला असून, अमरावती विभागातून या निधीसाठी निवड झालेला वाशिम हा एकमेव जिल्हा आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे व महास्ट्राईडचे अनंता मुद्गले ,

पोलीस विभागातील अधिकारी व अंमलदारांना अतिउत्कृष्ट सेवा पदक आणि उत्कृष्ट सेवा पदकाने गौरविण्यात आले. तसेच जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळविल्याबद्दल माउंट कार्मेल इंग्लिश स्कूल, वाशिम, यशवंतराव चव्हाण सैनिक शाळा, सुपखेला, कानडे इंटरनॅशनल स्कूल, वाशिम, विदर्भ पब्लिक स्कूल, मालेगाव आणि यशवंतराव चव्हाण विद्यालय, काजळंबा यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आर. जे. चवरे विद्यालय, कारंजा येथील विद्यार्थिनी कु. आरुषी रुपेश ढोरे हिने राज्य गुणवत्ता यादीत तेरावा क्रमांक मिळविल्याबद्दल, उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवीमध्ये मोहम्मद महिन अलिमोद्दीन शेख याने राज्य गुणवत्ता यादीत सोळावा क्रमांक मिळविल्याबद्दल तसेच विश्वा इंटरनॅशनल स्कूल, रिसोड येथील विद्यार्थ्याने प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत चौदावा क्रमांक मिळविल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या राष्ट्रीय अभियानाच्या अनुषंगाने मुलीच्या जन्माचे स्वागत आणि मुलींच्या सन्मानाला प्रोत्साहन देण्यासाठी कोमल अजय यादव, युवांशी शिवाजी ढगे आणि अश्विनी प्रवीण लगड यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

जलसंधारण सप्ताह आणि जलसंधारण अभियानाला जिल्ह्यात आजपासून सुरुवात होत असून, या अभियानात जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे,  तसेच १५ ते २१ ऑगस्टदरम्यान आयोजित ‘रील फॉर सॉईल अँड वॉटर कंजर्वेशन’ अर्थात मृद व जलसंधारण विषयावरील रील स्पर्धेत १५ ते ३० वयोगटातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या अनुषंगाने महा वॉकेथॉन २०२६ – वॉक फॉर वॉटरच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. तसेच उपस्थितांनी मृद व जलसंधारणाची शपथ घेत जलसंवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला. 


संचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत व नायब तहसीलदार अर्चना घोळवे यांनी केले

कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, माजीसैनिक, पत्रकार, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Response to "भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article