जलसंधारणातून जलसुरक्षिततेकडे ठोस पावले उचलावीत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
साप्ताहिक सागर आदित्य
जलसंधारणातून जलसुरक्षिततेकडे ठोस पावले उचलावीत
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
जलसंधारण विभागाच्या कामांचा आढावा
जलसंधारण कामांचे नियोजन अधिक शास्त्रीय, वास्तवदर्शी आणि दीर्घकालीन परिणाम देणारे असणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना २.० आणि जलयुक्त शिवार अंतर्गत राबविण्यात येणारी कामे केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात परिणामकारक ठरली पाहिजेत. नाला खोलीकरणास प्राधान्य देऊन पूरस्थितीवर नियंत्रण, पाणी साठवण क्षमता वाढ आणि भूजल पुनर्भरण साध्य करणे ही आजची गरज आहे. प्रत्येक मंजूर कामाची वेळेत पूर्तता, गुणवत्तेची खात्री आणि जिओ टॅगींगद्वारे पारदर्शक अंमलबजावणी झाली पाहिजे. जलसंधारण ही जिल्ह्याच्या पाणी-सुरक्षेसाठी केलेली गुंतवणूक असून त्यातून शेतकऱ्यांना स्थैर्य मिळण्याकरिता जलसंधारणातून जलसुरक्षिततेकडे ठोस पावले उचलावीत असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या जलसंधारण कामांचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी श्याम फेरवानी आणि सहाय्यक जिल्हा जलसंधारण अधिकारी अपूर्वा नानोटकर , लघुपाटबंधारे विभाग बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता हेमंतकुमार चव्हाण, लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता रजत बिजवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना २.० अंतर्गत बाब बदल झालेली (scope / बाब बदल) कामे २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पूर्ण होतील, याची लेखी हमी संबंधित यंत्रणांकडून घेऊन सदर कामांना मंजुरी देण्यात आली. कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पूर्ण होणे अत्यावश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले.जलसंधारण विभागाच्या आराखड्याबाबत शासनाकडून लेखी मार्गदर्शन मागवावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच जिल्हास्तरीय समितीकडे प्राप्त होणाऱ्या निवेदने व तक्रारींच्या अनुषंगाने नाला खोलीकरणाचे प्रस्ताव मागवावेत, असेही त्यांनी सूचित केले.
अभूतपूर्व अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी नियोजनबद्ध प्रस्ताव तयार करून त्यामध्ये नाला खोलीकरणाला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा, पूरस्थितीवर नियंत्रण आणि भूजल पुनर्भरण या दृष्टीने खोलीकरणाची कामे महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
बैठकीत जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत त्रयस्थ संस्थेमार्फत होणाऱ्या मूल्यमापनाच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. तसेच जलयुक्त शिवारच्या कामांचे जिओ टॅगींग बाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. सर्व कामांचे अचूक जिओ टॅगींग करून पारदर्शकता राखावी व प्रगतीचे दस्तऐवजीकरण काटेकोरपणे करावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले.
जलसंधारणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शाश्वत पाणीपुरवठा, दुष्काळी परिस्थितीवर मात आणि पर्यावरणपूरक विकास साधण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून, सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने व जबाबदारीने काम करण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
0 Response to "जलसंधारणातून जलसुरक्षिततेकडे ठोस पावले उचलावीत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर "
Post a Comment